Sushmita Mukherjee on working in c grade movies: जेष्ठ अभिनेत्री सुष्मिता मुखर्जी यांना गंगा मालिकेतील अम्मा या पात्रामुळे मोठ्या प्रमाणात ओळख मिळाली. मालिकांबरोबरच त्यांनी अनेक बॉलीवूड सिनेमांतही काम केले आहे. ‘किंग अंकल’, ‘खलनायक’, ‘गोलमाल’ अशा सिनेमांत त्यांनी काम केले आहे. त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या.
सुष्मिता मुखर्जी यांनी सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल सांगितले आहे. सी ग्रेड सिनेमांत काम का केले, याबद्दल त्यांनी खुलासा केला आहे.
“मी व माझ्या पतीने तीन-चार वर्षांत…”
व्हिडीओमध्ये त्या म्हणाल्या, “कोणीतरी मला विचारले की तुम्ही खराब सिनेमांत का काम केले? तो प्रश्न ऐकून मला खूप धक्का बसला होता. ते प्रोजेक्ट करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता. त्यावर मला अजिबात गर्व नाही. माझ्या आयुष्यातील त्या काळाबद्दल आठवणे माझ्यासाठी खूप कठीण आहे. तो काळ अस्वस्थ करणारा आहे.मी काही पॉर्नोग्राफीमध्ये काम केले नाही पण, सी ग्रेड सिनेमात काम केले. चित्रपटांची निवड चुकली.”
पुढे त्या म्हणाल्या, “२००२ मध्ये माझी व माझ्या पतीची प्रयास ही मीडिया कंपनी बुडाली. त्यावर १ कोटीचे कर्ज होते. त्यावेळी नवीन तंत्रज्ञान आले होते. आम्हाला त्याबद्दल काही माहीत नव्हते. त्यामुळे कंपनीचे नुकसान झाले.ज्यांनी कर्ज दिले होते, ते घरी यायचे, शिव्या द्यायचे. तो खूप वाईट काळ होता. ते कर्ज फेडण्यासाठी मला तशा सिनेमांत काम करावे लागले. मी व माझ्या पतीने तीन-चार वर्षांत ते कर्ज फेडले.”
तसेच, त्या असेही म्हणाल्या की मी माझ्या मुलीला परदेशात शिक्षणासाठी पाठवले होते. तिथला खर्चही जास्त होता. त्यामुळे मला ते निर्णय घ्यावे लागले.
सुष्मिता मुखर्जी यांनी चित्रपट निर्माते सुधीर मिश्रा यांच्याशी १९७८ मध्ये लग्न केले होते. मात्र, काही काळानंतर लगेचच त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर १९९३ मध्ये त्यांनी राजा बुंदेला यांच्याशी लग्न केले. त्या म्हणाल्या, “मी त्या काळी जे निर्णय घेतले, त्याबद्दल मला कोणताही पश्चात्ताप नाही. मी माझ्या मुलांना चांगले शिक्षण दिले आहे. ते त्यांच्या पायावर उभे आहेत. पण, या सगळ्यासाठीच मी ते सगळे निर्णय घेतले. मला खराब कामेही करावी लागली.”
दरम्यान, सुष्मिता मुखर्जी यांनी काही सीरिजमध्येही काम केले आहे. त्यांनी डब्बा कार्टेल, पटना शुक्ला अशा वेब सीरिज आणि सिनेमांत केले आहे. आता आर्थिक स्थैर्य असल्याने प्रोजेक्ट निवडताना विचार करून निवडत असल्याचे वक्तव्य सुष्मिता मुखर्जी यांनी केले.
