Shaan buy luxury Bungalow In Pune: ‘तनू वेड्स मनू’, ‘कल हो ना हो’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांतील गाण्यांना गायक शान(Shaan)ने आवाज दिला आहे. आता शान त्याच्या गाण्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे चर्चत आला आहे.

शान व त्याची पत्नी राधिका मुखर्जीने पुण्यात एक अलिशान बंगला खरेदी केला आहे. विशेष म्हणजे बंगल्याबरोबरच त्याने प्लॉटही खरेदी केला आहे. आता त्याने बंगला कुठे खरेदी केला आहे, त्याची किंमत काय, हे सविस्तर जाणून घेऊ…

शानने पुण्यात कोणत्या ठिकाणी घेतला बंगला?

स्क्वेअर यार्डकडे असलेल्या मालमत्ता नोंदणी कागदपत्रांनुसार शान व त्याच्या पत्नीने पुण्यातील प्रभाचीवाडी येथे १० कोटींचा आलिशान बंगला खरेदी केला आहे. प्रभाचीवाडी हे ठिकाण पुण्यातील मावळ तालुक्यात आहे. आयजीआर प्रॉपर्टी नोंदणी कागदपत्रांनुसार शान व त्याच्या पत्नीने पुण्यात बंगला आणि प्लॉट खरेदी केला आहे, ज्याचे क्षेत्रफळ सुमारे ०.४ हेक्टर आहे; तर बंगल्याचे क्षेत्रफळ हे ५५०० स्क्वेअर फूट आहे, यासाठी शानला ५० लाखांची स्टॅम्प ड्युटी भरावी लागली आहे, तर ३० हजार नोंदणी फी भरावी लागली आहे.

शानच्या कामाबद्दल बोलायचे तर त्याने दोन दशकांहून अधिक बॉलीवूडमध्ये काम केले आहे. ‘बम बम बोले’, ‘मुरली की तानों से’, ‘चांद सिफारिश’, ‘आज उनसे मिलना है’, ‘ऑल इज वेल’, ‘वो लडकी है कहाँ’ अशी अनेक गाणी गात चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. त्याचा चाहतावर्ग मोठा असून त्याच्या कॉन्सर्टलादेखील मोठी गर्दी होत असल्याचे दिसते.

काही दिवसांपूर्वीच शानने रिॲलिटी शोमध्ये स्पर्धक प्रत्यक्षात गातच नाहीत, असे वक्तव्य केले. विकी लालवाणींना दिलेल्या मुलाखतीत शान म्हणाला, “मी हे फक्त बोलत नाही, तर मला खात्री आहे की, रिॲलिटी शोमधील स्पर्धक गाणी पुन्हा डब करतात. शोमध्ये स्पर्धक स्टेजवर जे गातात, ते प्रत्यक्षात वापरलं जात नाही. त्याऐवजी नंतर स्टुडिओमध्ये गाणं पुन्हा रेकॉर्ड करून एडिट केलं जातं. स्पर्धक फक्त एकदाच लाईव्ह गातात. नंतर त्यांना स्टुडिओमध्ये नेलं जातं आणि गाणं पुन्हा रेकॉर्ड केलं जातं”, त्याचे हे वक्तव्य चांगलेच चर्चेत असल्याचे पाहायला मिळाले होते.

दरम्यान, रिअॅलिटी शोबद्दल प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न असल्याचे दिसते. हे शो स्क्रीप्टेड असतात का, असाही प्रश्न विचारला जातो. शानने अनेक रिअॅलिटी शोमध्ये परिक्षकाची जबाबदारी निभावल्याचे पाहायला मिळते.