Shabana Azmi Interview On Bollywood Women Objectification : बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी या सध्या ‘आवारापन २’ सिनेमाला मिळालेल्या यशामुळे चर्चेत आहेत. त्याचबरोबर त्यांनी सनी देओलच्या ‘बटवारा १९४७’मध्येही प्रभावी भूमिका साकारली आहे. अनेक दशके सिनेविश्वामध्ये काम करणाऱ्या शबाना आझमींनी हिंदी सिनेमातील बदल आणि महिला कलाकारांच्या भूमिकांमध्ये काळानुसार झालेले बदल यावर मत व्यक्त केले आहे.
‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत शबाना आझमी यांनी बॉलीवूडमधील अनुभव सांगितले. त्याचबरोबर काळानुसार सिनेमांमध्ये आणि त्यातील स्त्री पात्रांच्या भूमिकेमध्ये झालेले बदल याबद्दल मत व्यक्त केलं. यावेळी शबाना आझमी यांनी बॉलीवूडमध्ये सुरू असलेल्या अति-लैंगिकीकरण यावर स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली.
अभिनेत्रींच्या बॉलीवूडमध्ये ‘स्टिरिओटाइपिकल’ भूमिका
सिनेमातील स्त्री भूमिकांबाबत बोलताना शबाना आझमी यांनी जुन्या काळातील अभिनेत्रींची आठवण सांगितली. त्या म्हणाल्या, “आधी चित्रपटांमध्ये मीना कुमारी, नंदा आणि नूतन होत्या, त्यांना एखाद्या ‘स्टिरिओटाइपिकल’ अशा ठराविक भूमिकांमध्येच दाखवलं जात होतं. पण, जसा काळ बदलत गेला तसं लोकांच्या लक्षात आलं की, आता अशी स्त्री पात्र स्वीकारली जाणार नाहीत, त्यामुळे स्त्री भूमिकांमध्ये बदल करण्यात आले आणि तिला वेगळ्या पद्धतीने पडद्यावर मांडलं जाऊ लागलं.”
पुरुषाचा वेष घेतल्यासारख्या स्त्री भूमिका
पुढे श्याम बेनेगल यांनी महिलांच्या अशा भूमिकांना ‘स्टिरिओटाइपिकल रॅम्बोलिना’ म्हटल्याचं शबाना आझमी यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या, “पूर्वी ‘मी गप्प बसेन’ हाच स्त्रीमध्ये खूप चांगला गुण आहे, असं मानलं जायचं. त्यानंतर सिनेमांमध्ये हिरोईन, “मी तुला मरू देणार नाही, मी तुला जगू देणार नाही, मी एक जखमी स्त्री आहे” अशा डायलॉगमधूनच तिचा राग व्यक्त करताना दिसत होती. पण, त्यामुळे स्त्री म्हणून ती वेगळी वाटतच नव्हती; ती अक्षरशः पुरुषाचा वेष घेतल्यासारखीच वाटत होती.”
याबद्दल शबाना म्हणाल्या, “सिनेमांमध्ये जेवढ्या स्टिरियोटाइपिकल पुरुषांच्या भूमिका होत्या, तशाच स्त्रियांच्यासुद्धा होत्या. पुरुषांना तर अतिशयोक्ती करणाराच दाखवलं जात होतं. पडद्यावर स्त्रियांच्या भावना आणि वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका या पॅरलल सिनेमांनी मांडल्या. पॅरलल सिनेमांमुळे महिलांना वास्तववादी पद्धतीनं दाखवण्याची संधी मिळाली.”
सौंदर्य आणि लैंगिकता साजरी करणं ही वेगळी गोष्ट – शबाना
पुढे त्या म्हणाल्या, “एका बाजूला महिलांना वस्तूप्रमाणे दाखवलं जात होतं, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका आणि व्यक्तिमत्त्वाच्या छटाही पडद्यावर मांडल्या जात होत्या. पण, मला महिलांच्या अति-लैंगिकीकरणचा मुद्दा नेहमीच खटकत आला आहे. मला वाटतं याबाबत अजूनही थोडा गोंधळ आहे. काही अभिनेत्री म्हणतात की, ‘एखादा अभिनेता त्याचं शरीर दाखवू शकतो, तर मी माझं शरीर का दाखवू शकत नाही?’ मात्र स्वतःचं सौंदर्य आणि लैंगिकता साजरी करणं ही वेगळी गोष्ट आहे; तर अति-लैंगिकीकरणाला शरण जाणं पूर्णपणे वेगळं आहे, सध्या अनेक चित्रपटांमध्ये हेच घडत आहे.”
