ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी आणि लेखक-गीतकार जावेद अख्तर यांच्या लग्नाला चार दशकांहून अधिक काळ झाला आहे. दोघे बॉलीवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहेत. अनेकजण त्यांनी ज्या प्रकारे एकमेकांना साथ दिली आहे त्यासाठी त्यांचं कौतुक करतात. मात्र अशातच आता शबाना आझमी यांनी जावेद अख्तर यांच्याबरोबरच्या त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल खुलासा केला आहे.

‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत शबाना आझमी यांनी जावेद अख्तर यांच्याबरोबरच्या वैवाहिक जीवनाबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं. जावेद यांच्यातील कोणत्या गुणांमुळे त्या त्यांच्याकडे आकर्षित झाल्या आणि दोघांमधील समान मूल्यांमुळे त्यांचं नातं अधिक घट्ट होण्यास कशी मदत झाली, हे त्यांनी सांगितलं. याशिवाय शबाना यांनी जावेद अख्तर यांच्या एक्स पत्नी हनी इराणी यांच्याबरोबरच्या नात्याबद्दलही भाष्य केलं.

जावेद अख्तर यांच्याबरोबर मोठे वाद व्हायचे – शबाना आझमी

शबाना आझमी यांनी सांगितलं की, जावेद अख्तर यांचा हजरजबाबीपण आणि बुद्धिमत्ता त्यांना खूप भावली होती. जावेद हे आपण भेटलेल्या सर्वांत बुद्धिमान व्यक्तींपैकी एक असल्याचंही त्यांनी म्हटलं. विशेष म्हणजे, जावेद अख्तर आणि त्यांच्या वडिलांमध्ये अनेक साम्य असल्याचं शबाना यांनी सांगितलं. जावेद अख्तर यांना ओळखताना आपल्याला वडिलांना पुन्हा नव्याने शोधल्यासारखं वाटलं, असा अनुभव त्यांनी व्यक्त केला. मात्र, दोघांच्या नात्यात मतभेदही व्हायचे. शबाना यांनी जावेद अख्तर यांच्याबरोबर मोठे वाद आणि भांडणं होत असल्याचाही खुलासा केला.

आमच्यात सगळं काही आलबेल असतं असं नाही – शबाना आझमी

त्या पुढे म्हणाल्या, “दोघांचीही कौटुंबिक पार्श्वभूमी अगदी सारखी आहे. आमचे आई-वडील पुरोगामी विचारांचे लेखक होते आणि कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित होते. दोघांनाही उर्दू कविता आवडायची. त्यामुळे अनेकांना आमचं अरेंज मॅरेज असावं, असं वाटायचं.” शबाना यांनी पुढे सांगितलं की, त्यांच्यात आणि जावेद अख्तर यांच्यात मोठे वादही होतात. “जावेद आणि माझ्यात खूप मोठी भांडणं होतात. आमच्यात सगळं काही आलबेल असतं असं नाही. पण आमची मैत्री खूप घट्ट आहे आणि जगाकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोनही सारखा आहे. आमची विचारसरणी एकसारखी आहे. माझ्यासाठी हेच सर्वांत महत्त्वाचं आहे” असं त्या म्हणाल्या. जावेद अख्तर यांच्या व्यक्तिमत्त्वाचं कौतुक करताना त्या म्हणाल्या, “ते कोणत्याही व्यक्तीच्या सहवासात अगदी सहज वावरू शकतात. लोकांशी संवाद साधण्याची त्यांची क्षमता खूप चांगली आहे. ते अतिशय निष्पक्ष व्यक्ती आहेत आणि त्यांच्या या गुणाचा मला खूप आदर वाटतो.”

शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांनी लग्न केलं, तेव्हा त्यांच्या नात्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. कारण जावेद अख्तर यांचं यापूर्वीच लेखिका हनी इराणी यांच्यासह लग्न झालं होतं. मात्र, या सगळ्या परिस्थितीत हनी इराणी यांनी अतिशय समजूतदारपणे परिस्थिती हाताळल्याचं शबाना यांनी सांगितलं. सुरुवातीला परिस्थिती कठीण होती, तरीही हनी यांनी वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून नातं जपण्याचा प्रयत्न केला, असं शबाना म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या, “माझ्यासाठी हनी कुटुंबातीलच एक सदस्य आहे. त्या जावेद यांच्या बहिणीसारख्या आहेत. आमचं नातं खूप चांगलं आहे. त्यांनी कधीही मुलांच्या मनात माझ्याबद्दल द्वेष निर्माण केला नाही. तसेच, मुलांसमोर कधीही त्यांच्या वडिलांबद्दल वाईट बोलल्या नाही किंवा मुलांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला नाही.” शबाना पुढे म्हणाल्या, “त्या अतिशय समजूतदार व्यक्ती आहेत. त्यांच्या मोठेपणामुळे आणि बुद्धिमत्तेमुळे हे नातं जपणं माझ्यासाठी खूप सोपं झालं. त्यांच्याबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे.”

जावेद अख्तर यांचं यापूर्वी पटकथालेखिका हनी इराणी यांच्याबरोबर लग्न झालं होतं. दोघांना झोया अख्तर आणि फरहान अख्तर ही दोन मुलं आहेत. घटस्फोटानंतर जावेद अख्तर यांनी १९८४ मध्ये शबाना आझमी यांच्याबरोबर लग्न केलं.