Shabana Azmi recalls mother warned her: बॉलीवूडला एका वेगळ्या उंचीवर नेण्यात जितके कलाकारांचे योगदान आहे, तितकेच दिग्दर्शक, लेखक, निर्मात्यांचेदेखील आहे. त्यामध्ये सलीम-जावेद या लेखक जोडीचे नाव प्रामुख्याने घेतले जाते.

बॉलीवूडला या जोडीने ‘अँग्री यंग मॅन’ दिला. त्यांनी लिहिलेल्या चित्रपटांतील कलाकार लोकप्रिय ठरले. पुढे सलीम खान आणि जावेद अख्तर हे व्यावसायिकदृष्ट्या वेगळे झाले. मात्र, आजही त्यांच्यात मैत्री टिकून आहे.

जावेद अख्तर पटकथा लेखक असण्याबरोबरच गीतकार म्हणूनही लोकप्रिय ठरले. व्यावसायिक गोष्टींमुळे जावेद अख्तर जितके चर्चेत राहिले, तितकेच ते त्यांच्या खासगी आयुष्याचीदेखील चर्चा झाली. पहिले लग्न झाले असताना त्यांनी अभिनेत्री शबाना आझमी यांच्याबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नाला जवळजवळ ४१ वर्षे पूर्ण झाली आहेत. ते अनेकदा त्यांच्या नात्याबद्दल बोलतात.

“ते अजिबात रोमँटिक नाहीत”

आता या जोडप्याने ‘मोजो स्टोरी’ला मुलाखत दिली. शबाना आझमींच्या ते प्रेमात पडले, असा क्षण कोणता? यावर जावेद अख्तर म्हणाले, “चित्रपटात लोक जसे एकमेकांच्या प्रेमात पडतात, तसे खऱ्या आयुष्यात घडत नाही. प्रेम हळूहळू होणारी गोष्ट आहे. कोणीही सांगू शकत नाही अमुक एका क्षणी प्रेमात पडलो.”

जावेद अख्तर यांच्या वक्तव्यावर शबाना आझमी म्हणाल्या, “ते रोमँटिक चित्रपट लिहितात, म्हणून ते रोमँटिक पती असतील, असे अनेकांना वाटत असेल; पण ते अजिबात रोमँटिक नाहीत.”

जावेद अख्तर यांनी शबाना आझमी यांना फुलांच्या दुकानातील सगळी फुले घेऊन दिली होती, त्याबद्दल विचारले. त्यावर जावेद अख्तर असे म्हणाले की, असे काही नाही. ते एकाच वेळी घडले होते. त्यावर शबाना आझमी यांनी तो संपूर्ण किस्सा सांगितला.

शबाना आझमी म्हणाल्या, “आम्ही जेव्हा रिलेशनशिपमध्ये होतो, तेव्हाची गोष्ट आहे. एकदा आम्ही एका फुलांच्या दुकानापासून जात होतो. मी जावेद यांना म्हणाले की, फुले खूप सुंदर आहेत. त्यांनी कार थांबवली आणि त्या दुकानातील सगळी फुले खरेदी केली. “

“ती कविता माझ्या आईने…”

पुढे शबाना आझमी यांनी आणखी किस्सा सांगितला. एकदा त्यांच्या आईने जावेद अख्तर यांच्याबरोबर लग्न करण्याआधी बजावले होते. त्याची आठवण त्यांनी सांगितली. त्या म्हणाल्या, “आम्ही एकदा बोलत नव्हतो. तेव्हा जावेद यांनी माझ्यासाठी एक कविता पाठविली. ती कविता माझ्या आईने वाचली. त्यानंतर ती मला म्हणाली की, यामध्ये फसू नकोस. एक कवी त्याच्या शब्दांनी जाळ्यात अडकवतो. त्याच्यापासून दूर राहा.”

शबाना आझमी आणि जावेद अख्तर एक परिपूर्ण जोडपे असल्याचे म्हटले जाते. मात्र, या जोडप्याने सांगितले की, त्यांच्यातही भांडणे होतात. शबाना आझमी म्हणाल्या, “आम्ही भांडणे करतो. जेव्हा आमच्या लक्षात येते की, आम्ही एकमेकांना वाईट वागवणार आहोत; पण तेव्हा आम्ही सोडून दे, असे म्हणतो आणि ज्या मुद्द्यावरून भांडत असतो, ते सोडून देतो. १० दिवसांनी शांतपणे त्या गोष्टींचा विचार केला जातो. असे केल्यामुळे एकमेकांना दुखावण्याचे प्रमाण कमी होते, एकमेकांचा अनादर केला जात नाही. तसेच, गोष्टींचा पश्चात्तापही होत नाही.”