Shabana Azmi Reacts on CJP Protest: २० जुलै रोजी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत ‘कॉक्रोच जनता पार्टी’ने केलेल्या आंदोलनात ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी हजेरी लावली होती. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईवर शबाना आझमी यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. “मी स्वतः तिथे उपस्थित असताना लहान मुलांवर आणि तरुण मुलींवर लाठीचार्ज करण्यात आला. अश्रूधुराच्या नळकांड्या सोडल्या गेल्या आणि फोन जॅमर लावून माईक कनेक्शन तोडण्यात आले,” असा धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे. जखमी विद्यार्थी रडत मला त्यांच्या जखमा दाखवत होते, असा दावा ‘इंडिया टुडे’शी बोलताना शबाना आझमी यांनी केलाय.

“अश्रूधुराच्या नळकांड्या सोडण्यात आला तेव्हा मी स्वतः तिथे उपस्थित होते. लहान मुलांवर आणि तरुण मुलींवर लाठीचार्ज करताना मी स्वतः पाहिलंय. कुणीतरी बुट फेकला आणि त्यामुळे ही कारवाई सुरू झाली, असं म्हणत त्यांनी याचं खापर विद्यार्थ्यांवरच फोडण्याचा प्रयत्न केला. पण मी जे पाहिलं ते तसं नव्हतं आणि सर्व विद्यार्थीही तेच सांगत होते. विद्यार्थी मला त्यांच्या जखमा दाखवत होते आणि म्हणत होते की त्यांना पूर्णपणे अहिंसक मार्गाने आंदोलन करायचं होतं, मंचावरून विद्यार्थ्यांना सतत हेच सांगितलं जात होतं,” असं शबाना आझमी म्हणाल्या.

आंदोलनात लहान मुलंही सहभागी झाली होती – शबाना आझमी

शबाना आझमींनी सांगितलं की विद्यार्थी संतापले होते, त्यांच्या मनात खूप राग होता, तरीही हे आंदोलन अहिंसक मार्गानेच करायचं असं त्यांनी ठरवलं होतं. आंदोलनात १५ वर्षांची लहान मुलंही सहभागी झाली होती. विद्यार्थ्यांची इच्छा एवढीच होती की त्यांचं म्हणणं ऐकलं जावं, पण कुणीही त्यांच्याशी चर्चा केली नाही याबद्दल शबाना आझमींनी आश्चर्य व्यक्त केलं.

शबाना आझमी पुढे म्हणाल्या, “आम्ही ऐकलंय की, आज त्यांनी ही जागा रिकामी करण्यास सांगितलंय. पण जर मंगळवारी तिथे पुन्हा गर्दी झाली, तर ते त्याला हिंसक वळण देतील आणि नंतर निमलष्करी दलांना बोलावून या घटनेला अत्यंत हिंसक वळण देतील, असंही आम्ही ऐकलंय. असं कोणी वागतं का?”

जे. पी. नड्डा यांनी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना १० मिनिटांत परत पाठवलं

आंदोलनात काही असामाजिक प्रवृत्तीच्या लोकांचा सहभाग होता का? असं शबाना आझमींना विचारण्यात आलं. त्यावर कोणत्याही आंदोलनात असे लोक परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात, असं त्यांनी उत्तर दिलं. तिथल्या परिस्थितीबद्दल शबाना आझमी म्हणाल्या, “आम्हाला माहीत होतं की असं काहीतरी घडेल. पण जेव्हा विद्यार्थ्यांचे दोन प्रतिनिधी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांना भेटायला गेले, तेव्हा त्यांनी फक्त त्यांच्या तक्रारी लिहून द्या असं सांगितलं. १० मिनिटांत त्यांना परत पाठवलं, त्यांच्याशी कोणताही संवाद साधला नाही. ते विद्यार्थ्यांशी चर्चा का करू शकत नाहीत?” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

विद्यार्थी शैक्षणिक सुधारणांची मागणी करत होते आणि त्यांच्या मागण्या केवळ धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापुरत्या मर्यादित नव्हत्या. आंदोलन स्थळावर फोनचे जॅमर लावले होते आणि काही काळासाठी माईकचे कनेक्शनही तोडण्यात आले होते, असंही शबाना आझमींनी सांगितलं.