Shabana Azmi and Prateik Smita Patil: प्रतीक स्मिता पाटील हा विविध कारणांमुळे चर्चेत असतो. नुकताच तो इश्क फकीर या म्युझिक व्हिडीओमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या म्युझिक व्हिडीओच्या प्रमोशनच्या निमित्ताने त्याने विविध मुलाखती दिल्या.

या मुलाखतींमधील त्याच्या वक्तव्यांची चांगलीच चर्चा होताना दिसली. त्याने लग्नाबद्दल, तसेच रिलेशनशिपबद्दल वक्तव्य केले. तसेच वडिलांना लग्नात न बोलावल्यामुळे त्याला ट्रोल करण्यात आले होते. त्यावर अभिनेता म्हणाला की आम्ही ट्रोलिंगकडे फार लक्ष दिले नाही. तो असेही म्हणाला की अनेकांना सत्य माहीत नाही. इंडस्ट्रीमधील काहींना सत्य माहीत आहे, काहींना नाही. पण, एक दिवस असा येईल की सर्वांना सत्य माहीत होईल.

“मला माहीत आहे की स्मिता…”

आता या सगळ्यात प्रतीक स्मिता पाटीलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विकास खन्ना यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शबाना आझमी आणि प्रतीक दिसत आहेत.

विकास खन्ना विचारतो की, प्रतीक हे किती वर्षांनी घडत आहे? त्यावर प्रतीक म्हणतो, “२५ वर्षे.” शबाना आझमी म्हणतात, “मी त्याला मिठी मारण्यासाठी २५ वर्षे वाट पाहिली.” त्यावर प्रतीक हसत म्हणतो, “२५ वर्षांत हे कितीतरी वेळा घडले आहे.” शबाना आझमी पुढे असेही म्हणतात, “मला माहीत आहे की स्मिता बघत आहे.” त्यावर प्रतीक म्हणतो, “हो ती बघत आणि आनंदी आहे.”

विकास खन्ना यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या इमॅजनरी रेनमध्ये शबाना आझमी आणि प्रतीक स्मिता पाटील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत, तर ए. आर. रेहमान यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे.

नेटकरी म्हणाले…

शबाना आझमी आणि स्मिता पाटील यांचा व्हिडीओ शेअर करताना विकास खन्ना यांनी लिहिले की, मी या क्षणाची जवळपास साडे सहा वर्षे वाट पाहिली आहे.

आता या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. “शबानाजी प्रतीकवर मुलाप्रमाणे प्रेम करतात, हे पाहताना स्मिताजींची आठवणही येते”, “त्या त्याची आई स्मिता पाटील यांच्याप्रमाणे वाटत आहेत”, “शबानाजींनी त्यांचे वचन खूप प्रेमाने निभावले आहे”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.

एका मुलाखतीत स्मिता पाटील यांच्या निधनानंतर शबाना आझमी प्रतीकला दत्तक घेण्याचा विचार करत होत्या असे प्रतीकने सांगितले होते. तो म्हणाला होता, “मला अलीकडच्या काळात समजले की माझ्या आईच्या निधनानंतर शबानाजी आणि जावेद साहेब यांना मला दत्तक घेण्याची इच्छा होती, पण ते थोडे गुंतागुंतीचे होते. आज मी फरहान अख्तरचा सावत्र भाऊ असतो; पण या गोष्टीने मला भारावून टाकले. जर जावेद अख्तर व शबाना आझमी यांनी मला दत्तक घेतले असते, तर आज मी कसं आयुष्य जगत असतो हे माहीत नाही.”