टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री शगुफ्ता अली यांनी नुकताच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत एक भावनिक खुलासा केला आहे. त्यांनी सांगितलं की, त्यांनी आजपर्यंत लग्न केलेलं नाही, कारण ज्या व्यक्तीवर त्यांनी तब्बल २६ वर्षे मनापासून प्रेम केलं, त्यांचं निधन झालं. शगुफ्ता यांनी त्यांची अपूर्ण राहिलेली प्रेमकहाणी सांगितली. त्या म्हणाल्या की, प्रियकराच्या निधनानंतर त्यांनी पुन्हा कधीही लग्नाचा विचार केला नाही.
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत शगुफ्ता अली म्हणाल्या, “ज्यांच्याशी मला लग्न करायचं होतं, त्यांचं निधन झालं.” त्यानंतर त्यांना ही घटना किती वर्षांपूर्वीची आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सांगितलं, “२०११ मध्ये त्यांचं निधन झालं.” शगुफ्ता यांनी पुढे सांगितलं की, त्यांचे आणि त्यांच्या जोडीदाराचं नातं तब्बल २६ वर्षे टिकले. एवढी वर्षे एकत्र असूनही लग्न का झालं नाही, असं विचारल्यानंतर त्यांनी त्यामागील कारणही सांगितलं.
…म्हणून केलं नाही लग्न
शगुफ्ता म्हणाल्या, “जेव्हा जेव्हा आम्ही लग्नाचा विचार करायचो, तेव्हा काही ना काही अडचण यायची. कधी त्यांचा अपघात व्हायचा, कधी माझा अपघात व्हायचा. कधी मी शूटिंगमध्ये व्यग्र असायचे, तर कधी ते लंडनमध्ये असायचे. मग पुढच्या वाढदिवशी लग्न करू असं ठरवलं, तर त्यांच्या कुटुंबात काही समस्या निर्माण व्हायची. अशाच प्रकारे एकामागून एक अडथळे येत राहिले आणि वाट पाहता पाहता माझी २६ वर्षे निघून गेली.”
यावेळी शगुफ्ता अली यांनी त्यांच्या आयुष्यातील कठीण काळाबद्दलही मनमोकळेपणाने सांगितलं. त्या म्हणाल्या, “माझी प्रेमकहाणी, घरातील परिस्थिती आणि करिअर हा सगळा प्रवास खूप कठीण आणि वेदनादायी होता. त्यानंतर मला पुन्हा कधीच कोणावर प्रेम झालं नाही. मला दुसऱ्या कोणाशी लग्न करायचंच नव्हतं. ज्याच्यावर प्रेम केलं, त्याच्याशीच लग्न करायचं होतं.” त्या पुढे म्हणाल्या, “माझ्या आयुष्यात खूप वाईट काळ आला. मी खूप रडायचे. मात्र, मी नैराश्यात गेले नाही, कारण त्या काळात माझी आई माझ्याबरोबर होती. प्रत्येक पावलावर तिने मला आधार दिला.” शगुफ्ता अली यांचं वय माध्यमांच्या वृत्तानुसार ५९ इतकं असून त्या अविवाहित असल्या तरी त्यांनी दोन मुली दत्तक घेतल्या असून त्या त्यांचा सांभाळ करत आहेत. याबाबत त्यांनी मुलाखतीतही सांगितलं आहे.
शगुफ्ता अली यांनी १९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गीता की सौगंध’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर १९८९ मध्ये ‘दर्द’ या मालिकेद्वारे त्यांनी छोट्या पडद्यावर काम करायला सुरुवात केली. शगुफ्ता अली यांनी ‘पुनर्विवाह’, ‘एक वीर की अरदास… वीरा’, ‘ससुराल सिमर का’ आणि ‘साथ निभाना साथिया’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
