शाहरुख खान आज (२ नोव्हेंबर) त्याचा ६१ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने त्याच्या मुलाखतींमधून अभिनेत्याच्या दैनंदिन दिनक्रमाबद्दलच्या काही खास गोष्टी समोर आल्या आहेत. शाहरुख खान त्याच्या उत्साही स्वभावासाठी आणि चित्रपटांमधील भूमिकांसाठी केलेल्या शारीरिक बदलांसाठी ओळखला जातो. एकदा त्याने खाण्यापिण्याच्या सवयी आणि फिटनेस रुटीनबद्दल सांगितलं होतं. कशी असते शाहरुख खानची दिनचर्या जाणून घेऊ.
शाहरुख खान रात्री उशिरा व्यायाम करतो आणि साधारण पहाटे ५ वाजता झोपायला जातो. विशेष म्हणजे, शिस्तबद्ध जीवनशैली असूनही इतरांबरोबर जेवताना खाण्यापिण्यावर कोणतीही बंधनं घालत नसल्याचंही शाहरुखने सांगितलं होतं. आर.जे देवांगनाला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत शाहरुख खानने त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयींबद्दल सांगितलं होतं. तो कोणताही खास डाएट प्लॅन फॉलो करत नाही, तर साधं जेवण पसंत करतो. दिवसातून तो फक्त दोन वेळा जेवतो. यामध्ये दुपारचं आणि रात्रीचं जेवण असतं. याव्यतिरिक्त तो काहीही खात नाही.
दिवसातून फक्त दोन वेळा जेवतो, काय खातो?
याबद्दल बोलताना शाहरुख म्हणाला होता, “मला अगदी साधं जेवण आवडतं. मी दिवसातून दोन वेळा जेवतो. एकदा दुपारी आणि दुसऱ्यांदा रात्री. या दोन वेळच्या जेवणाव्यतिरिक्त मी काहीही खात नाही.” शाहरुख खानने त्याच्या रोजच्या जेवणाबद्दलही सांगितलं होतं. त्याच्या जेवणात फारसा बदल होत नाही. यामध्ये मोड आलेली कडधान्यं, ग्रिल्ड चिकन, ब्रोकोली आणि कधीकधी थोड्या प्रमाणात डाळीचा समावेश असतो. गेल्या अनेक वर्षांपासून तो जवळपास असाच आहार घेत असल्याचं त्याने सांगितलं होतं.
मात्र, प्रवासात असताना किंवा कोणाच्या घरी जेवायला गेल्यावर तो खाण्यापिण्याबाबत कोणतीही बंधनं पाळत नाही. याबद्दल बोलताना तो म्हणाला होता, “मला चमचमीत पदार्थ फारसे आवडत नाहीत, पण विमानातून प्रवास करताना किंवा कोणाच्या घरी जेवायला गेल्यावर त्यांनी प्रेमाने जे वाढलं असेल ते मी खातो. मग त्यात बिर्याणी असो, पोळी, पराठे, तुपात बनवलेले पदार्थ किंवा लस्सीचा ग्लास. इतरांसोबत जेवताना मी स्वतःवर कोणतीही बंधनं घालत नाही.”
पहाटे ५ वाजता झोपायला जातो शाहरुख खान
शाहरुख खानच्या झोपण्याच्या वेळाही इतरांपेक्षा काहीशा वेगळ्या आहेत. ‘द गार्डियन’ला दिलेल्या एका मुलाखतीत त्याने त्याच्या झोपण्याच्या वेळापत्रकाबद्दल सांगितलं होतं. तो साधारणपणे पहाटे ५ वाजता झोपायला जातो. याबद्दल बोलताना शाहरुख म्हणाला होता, “मार्क वॉलबर्ग ज्यावेळी दिवसाची सुरुवात करण्यासाठी उठत असतो, त्याचवेळी माझा दिवस संपत असतो.” याशिवाय, कामावरून घरी परतायला उशीर झाला तरी तो व्यायामासाठी वेळ काढतो. याबद्दल सांगताना तो म्हणाला होता, “रात्री उशिरा, कधीकधी दोन वाजताही मी घरी परततो. त्यानंतर अंघोळ करून झोपण्यापूर्वी व्यायाम करतो.”
लॉकडाउनमध्ये शाहरुख खानने केला फिटनेसवर फोकस
कोरोना लॉकडाउनच्या काळात शाहरुख खानला स्वतःच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळाली होती. वयाच्या ५५ व्या वर्षी त्याने कामातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. याबद्दल सांगताना तो म्हणाला होता, “वयाच्या ५५ व्या वर्षी मी ब्रेक घेण्याचं ठरवलं. लॉकडाउनमध्ये फारसं काही घडत नव्हतं. त्यामुळे मी माझ्या आजूबाजूच्या सर्वांना काहीतरी नवीन शिकण्याचा आणि व्यायाम सुरू करण्याचा सल्ला दिला. मी स्वतःही माझ्या सल्ल्याचं पालन केलं. नियमित व्यायाम केला आणि मला अभिमान वाटेल अशी शरीरयष्टी कमावली.”
यानंतर शाहरुखने ‘पठाण’ आणि ‘जवान’ या चित्रपटांमधून मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं. या दोन्ही चित्रपटांमध्ये त्याने दमदार अॅक्शन सीन्स केले होते. वयाची ६१ वर्षे पूर्ण करणारा शाहरुख खान आजही मनोरंजनविश्वात सक्रिय आहे. लवकरच तो मुलगी सुहाना खानसह ‘किंग’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
