Shah Rukh Khan Replace Aishwarya Rai : बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान व अभिनेत्री ऐश्वर्या राय यांनी जोश, मोहब्बतें व देवदास यांसारख्या सिनेमांमध्ये एकत्र स्क्रीन शेअर केली होती. त्यांच्या ऑनस्क्रीन जोडीला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले. मात्र, तरीही शाहरुख व ऐश्वर्या यांच्यामध्ये व्यावसायिक मतभेद झाल्याने पुढे त्यांनी एकत्र काम केले नाही. ‘स्क्रीन’ने दिलेल्या रिपोर्टनुसार, शाहरुख खानच्या अनेक यशस्वी चित्रपटांतून ऐश्वर्याला ऐन वेळी काढून टाकण्यात आले. ‘चलते चलते’ (२००३) यामध्येही ऐश्वर्याला काढून नंतर राणी मुखर्जीला घेण्यात आले होते.
शाहरुख खानच्या अनेक सिनेमांमधून ऐश्वर्याला काढून टाकल्याबद्दल तिला ‘रेंडेझव्हू विथ सिमी गरेवाल’ या कार्यक्रमात विचारण्यात आले होते. त्यावर ऐश्वर्या म्हणाली, “याचं उत्तर मी कसे देऊ शकते? त्यावेळी आम्ही एकत्र काम करणार असलेल्या काही सिनेमांबद्दल चर्चा सुरू होती. मात्र, अचानक कोणतंही स्पष्टीकरण न देता ते सिनेमे होणार नसल्याचं सांगण्यात आले. पण हे असं का झालं, याचं उत्तर मला कधीच मिळालं नाही.”
माझ्याकडे याचं उत्तर नाही – ऐश्वर्या
पुढे मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने ऐश्वर्याला सांगितले की, शाहरुख खानने एका मुलाखतीत या निर्णयाबद्दल खंत व्यक्त केली होती. ऐश्वर्याच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप केला होता आणि तसं करायला नको होतं, अशी कबुलीही त्यानं दिली होती. त्याबाबत ऐश्वर्या म्हणाली, “माझ्याकडे याचं उत्तर नाही.” तसेच त्या सिनेमांमध्ये काम न करण्याचा निर्णय तिचा नव्हता, हेही तिने स्पष्ट केले होते.

जाब विचारण्याचा माझा स्वभाव नाही – ऐश्वर्या
पुढे ऐश्वर्या राय म्हणाली, “जेव्हा एखाद्या गोष्टीचं कोणतंही स्पष्टीकरण मिळत नाही, तेव्हा आपल्यालाही याचा धक्काही बसतो. मनालाही वाईट वाटतं आणि खूप प्रश्न मनात तयार होतात. पण, याबद्दल समोरच्याला जाऊन जाब विचारण्याचा माझा स्वभाव नाही. त्या व्यक्तीला स्पष्टीकरण द्यायचं असेल, तर तो स्वतः येईल आणि तो आला नाही, म्हणजे त्याला स्पष्टीकरण देण्याची इच्छा नाही, हे लक्षात येतं. मी माझ्यापुरता या गोष्टींचा विचार केला असेल; पण त्याबद्दल समोरच्याला विचारलं नाही. देवाच्या कृपेनं माझी ओळख ही दुसऱ्या व्यक्तींच्या निर्णयावर अवलंबून नाही.”

शाहरुख खानने ऐश्वर्याला या परिस्थितीवर विचार करण्यासाठी पुरेसा वेळसुद्धा न दिल्याची खंत तिने व्यक्त केली होती. ती म्हणाली, “असं कधी झालं नाही की, अचानक माझ्याकडून हे सिनेमे काढून टाकले गेले आणि माझ्या करिअरमध्ये काहीच काम उरलं नाही. त्यामुळे ‘आता पुढे काय?’ किंवा ‘असं का झालं?’ असा विचार करत बसण्याची वेळ माझ्यावर आली नाही.”

शाहरुख खानने व्यक्त केलेली खंत
२००३ मध्ये ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत शाहरुख खानने ऐश्वर्या रायला सिनेमांमधून काढल्याच्या निर्णयाबद्दल खंत व्यक्त केली. शाहरुख खान चूक मान्य करीत म्हणाला, “एखाद्याबरोबर सिनेमा सुरू करून, तिची कोणतीही चूक नसताना तिला त्यातून रिप्लेस करणं खूपच अवघड असते. ऐश माझी चांगली मैत्रीण असल्यामुळे मला याचं खूप वाईट वाटलं होतं. वैयक्तिकरीत्या मला वाटतं की, माझ्याकडून चूक झाली. मात्र, निर्माता म्हणून तो निर्णय योग्य वाटत होता. मी ऐशची त्याबद्दल माफीही मागितली.”
