Honey Singh Drug Addiction : बॉलीवूडमध्ये यो यो हनी सिंग २०१० ते २०१४ काळात यशाच्या शिखरावर होता. त्याने भारतामध्ये पॉप-रॅप आणि देसी हिप-हॉप संगीतशैली लोकप्रिय केली. हनी सिंगची प्रत्येक गाणी तरुणाई डोक्यावर घेत होती. त्याचे गाण्याचे अल्बम असो वा चित्रपटातील गाणी सुपरहिट ठरत होती. ‘यो यो’ची स्टाईल आणि त्याचा स्वॅग चाहत्यांच्या पसंतीस उतरत होता. व्यवसायामध्ये यशाच्या शिखरावर असणारा यो यो हनी सिंग वैयक्तिक आयु्ष्यात मात्र मानसिक तणावातून जात होता. त्याच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ सुरू होते आणि त्याला ड्रग्जचे व्यसन लागले होते. याबाबत शाहरुख खान आणि अक्षय कुमारने आधीच सावध केल्याचा खुलासा हनी सिंगने केला आहे.

हनी सिंग मानसिक रोगाने त्रस्त

हनी सिंगने नुकतीच एबी टॉक्स (AB Talks)ला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्याने यश असूनही आलेले नैराश्य, मानसिक आरोग्यावर झालेला विपरित परिणाम आणि व्यसन यावर वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की, भारतातील सर्वात मोठा सुपरस्टार असूनही स्वतःला खोलीमध्ये बंद करून घेतले होते. मला ‘बायपोलर डिसऑर्डर’ची लक्षणे दिसू लागली होती. सात ते दहा वर्षांपूर्वी मी मानसिक आरोग्याच्या समस्येने त्रासलो होतो, असे हनी सिंगने सांगितले.

मी स्वतःला देव समजत होतो – हनी सिंग

पुढे हनी सिंग म्हणाला की, २०१३ आणि २०१४ या वर्षांत मी यशाच्या शिखरावर होतो, पण याच काळात मी पूर्णपणे भान हरपून गेलो होतो. त्या वेळी माझे विचार वेगळेच होते. जेव्हा मला यश मिळाले, तेव्हा माझी वागण्या-बोलण्याची पद्धत बदलली. अनेकदा मी लोकांचा अपमान करत असे. लवकर यश मिळाल्यामुळे मी स्वतःला देव समजू लागलो होतो, असे हनी सिंगने सांगितले आहे.

पुढे तो म्हणाला की, याच काळामध्ये मला ड्रग्जचे व्यसन लागले होते. माझ्या डोक्यात असुरी विचार यायचे. मी स्वतःला आरशात बघू शकत नव्हतो. जे घडले त्यासाठी मी मनोरंजन क्षेत्राला दोष देणार नाही, याचा दोष मी स्वतःला देतो. यशाची काळू बाजू असते असे काही नसते. जेव्हा तुमचे मन शांत आणि स्वच्छ नसते तेव्हा असे होते. माझ्याबाबतीत हेच झाले. मला खूप दिग्गज लोकांसह काम करण्याची संधी मिळाली होती. शाहरुख खान, अमिताभ बच्चन, सलमान खान, अक्षय कुमार यांच्यासह मी काम केले. ही अत्यंत साधी माणसे आहेत असे हनी सिंगने सांगितले.

शाहरुख आणि अक्षय कुमारने दिला होता सल्ला

ड्रग्जच्या व्यसनाबाबत शाहरुख खान आणि अक्षय कुमारने हनी सिंगला आधीच सावध केल्याचे त्याने सांगितले आहे. हनी सिंग म्हणाला की, “दिग्गज कलाकार माझ्यावर लक्ष ठेवायचे आणि मला व्यसनांपासून लांब राहण्याचा सल्ला देत होते. विशेषतः शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांनी मला ड्रग्जपासून लांब राहण्याचे सांगितले होते, कारण मी जे करत होतो ते चुकीचे होते. शाहरुखने मला अनेकदा सांगितले होते, ‘ड्रग्ज तुला उद्ध्वस्त करतील आणि तुला संपवून टाकतील,” असेदेखील हनी सिंगने सांगितले आहे.