Shah Rukh Khan dog death story : शाहरुख खान प्राण्यांवर खूप प्रेम करतो. त्याच्या घरी यापूर्वी डॅश (जपानी चिन), हल्क (लॅब्राडोर), काई आणि ज्युसी (माल्टीज) असे चार पाळीव श्वान होते, अशी माहिती आहे. शाहरुख त्याच्या पाळीव प्राण्यांशी खूप भावनिकरित्या जोडलेला होता. तनावपूर्ण परिस्थितीत तो प्राण्यांशी बोलून व्यक्त होतो असंही म्हटलं जातं.

सोशल मीडियावर सध्या एक जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गौरी खानच्या काकांनी एक खास किस्सा सांगितला आहे. त्यांनी दावा केला की, शाहरुख खानने एकदा मध्यरात्री त्याच्या पाळीव श्वानाचे थडगे उकरले होते आणि त्याला घराजवळ पुरलं होतं.

गौरी खानच्या मामांनी सांगितला भावुक क्षण

व्हिडीओमध्ये गौरीच्या काकांनी सांगितलं, “गौरी माझी भाची आहे, ती माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी आहे. मी तिला एक चायनीज पेकिंगीज जातीचा श्वान दिला होता. नंतर शाहरुखलाही तो श्वान खूप आवडला आणि तो त्याची खूप काळजी घ्यायचा.”

गौरी खानच्या काकांनी पुढे सांगितलं, “शाहरुख खान शूटिंगसाठी बाहेर गेला होता. त्याच्या अनुपस्थितीत त्या श्वानाचा मृत्यू झाला. घरात काम करणाऱ्या मुलांनी त्या श्वानाला सुंदर कापडात गुंडाळलं आणि समुद्रकिनाऱ्यावर नेलं. तिथे त्यांनी खड्डा खोदून त्याला पुरलं. मध्यरात्री शाहरुख घरी परतला आणि त्याने लगेच त्याच्या पाळीव श्वानाबद्दल विचारलं. घरातील कर्मचाऱ्यांनी शाहरुख खानला सांगितलं, सर, तो आता या जगात नाही. त्यावर शाहरुखने त्याला कुठे ठेवलं आहे? असं विचारलं घरातील कर्मचाऱ्यांनी समुद्रकिनाऱ्याजवळ त्याला पुरलं आहे.असं सांगितलं”.

गौरीचे काका पुढे म्हणाले, “रात्री अडीच वाजता शाहरुख खानने घरातील मुलांना उठवलं आणि मला दाखवा त्याला कुठे पुरलं आहे, असं सांगितलं. त्यानंतर त्याने स्वतः पाळीव श्वानाचे थडगे उकरले. त्याला परत घरी आणलं आणि घराच्या मागच्या बाजूला त्याला पुरलं. त्या जागेवर त्याने खूणही केली.” ते पुढे म्हणाले, “शाहरुख खूप भावुक झाला होता आणि रडलाही. त्याने संताप व्यक्त करत म्हटलं, माझ्या श्वानाला तुम्ही असं कसं दूर नेऊन पुरू शकता? तो जिवंत असो किंवा नसो, तो आमच्याबरोबरच राहायला हवा.”