Shah Rukh Khan and Dalip Tahil : जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता शाहरुख खानचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. त्याची खास शैली आणि रोमँटिक अंदाज यामुळे त्याला ‘बॉलीवूडचा बादशाह’ म्हणून ओळखलं जातं. अनेक दशकांनंतर आजही त्याची लोकप्रियता कायम आहे. पण, त्याच्या प्रसिद्धीचा एकदा अभिनेते दलिप ताहिल यांना फटका बसला होता. सिनेमामध्ये शाहरुख खानला त्रास दिल्याने विमानतळावर त्यांना एका चाहतीने थांबवून जाब विचारल्याची आठवण दलिप ताहिल यांनी सांगितली आहे.
करिअरच्या सुरुवातीला शाहरुख खानने केलेल्या ‘बाजीगर’ या चित्रपटातून त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. १९९३ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमामध्ये हिरोबरोबर खलनायकाच्या भूमिकेची तेवढीच चर्चा झाली होती. मदन चोप्रा हे खलनायकाचे पात्र दलिप ताहिल यांनी साकारले होते. पण, यामध्ये त्यांनी शाहरुख खानला त्रास दिल्यामुळे त्याच्या एका चाहतीने दलिप यांना लंडनमधील विमानतळावर थांबवून त्यांच्या वाईट वागणुकीबद्दल जाब विचारला होता.
शाहरुखच्या चाहतीनं केलेलं असं काही…
‘अनट्रिगर्ड विथ अमिनजाज’ या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये दलिप ताहिल यांनी सिनेविश्वातील अनुभव सांगितले. यावेळी त्यांनी शाहरुख खानच्या चाहतीचा एक प्रसंग सांगितला. ते म्हणाले, “लंडनमधील हिथ्रो विमानतळावर ते बोर्डिंगसाठी जात असताना एक तरुणी माझ्याजवळ आली होती आणि तिनं थेट विचारलेलं, “तुम्ही शाहरुख खानला एवढा त्रास का दिलात? तुम्ही असं का केलंत?” ती तरुणी शाहरुखची मोठी फॅन असल्याचं तिच्या बोलण्यावरून लक्षात येत होतं. तिचं ते बोलणं ऐकून काही वेळ तर खरंच असं वाटलं की, मी शाहरुखला खूप त्रास दिला आहे.”
यानंतर दलिप ताहिल यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, “मी त्या तरुणीला समजवण्याचा प्रयत्न केला होता. मी तिला सांगितलं, ‘त्यानं पण मला खूप त्रास दिला,’ पण माझ्या बोलण्याचा तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही. ती तरुणी मला म्हणाली, ‘त्यानं तुम्हाला मारलं, त्याने काही फरक पडत नाही. तुम्ही खलनायक आहात, त्याने तुम्हाला मारायलाच हवं, पण तुम्ही त्याच्याबरोबर असं का केलंत?’ असं ती तरुणी मला म्हणत होती.”
सिनेमांचा प्रेक्षकांच्या मनावर खोलवर परिणाम
पुढे दलिप ताहिल म्हणाले, “चित्रपटांतील भूमिकांचा आणि त्यातील पात्रांचा प्रेक्षकांच्या मनावर खूप खोलवर परिणाम होत असतो. या घटनेवरून तर किती खोलवर परिणाम होऊ शकतो हे माझ्या लक्षात आलं होतं.”
‘बाजीगर’मधील शाहरुखच्या भूमिकेनं वेधलं लक्ष
दरम्यान, ‘बाजीगर’ हा शाहरुख खानच्या गाजलेल्या सिनेमांपैकी एक आहे. मस्तान बर्मावाला व अब्बास बर्मावाला यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात शाहरुखने अजय शर्माची भूमिका साकारली होती, तर दलिप ताहिल यांनी मदन चोप्राची भूमिका केली होती. याचबरोबर काजोल, शिल्पा शेट्टी आणि जॉनी लिव्हर यांच्याही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका होत्या. चित्रपट प्रदर्शित होऊन तीन दशकांहून अधिक काळ झाला असला तरी ‘बाजीगर’ सिनेमा आणि त्यातील भूमिका प्रेक्षकांच्या मनामध्ये कायम आहेत.
