Shah Rukh Khan Deewana Debut Movie : बॉलीवूडचा ‘किंग खान’ म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान आज हिंदी चित्रपटसृष्टीतील मोठा सुपरस्टार आहे. त्याने १९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दीवाना’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर दमदार पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटातील त्याच्या अभिनयाने आणि दिव्या भारतीबरोबरच्या केमिस्ट्रीने शाहरुखने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं होतं. यानंतर शाहरुखचा यशस्वी प्रवास कधीच थांबला नाही. मात्र, या सिनेमात ‘राजा’ या भूमिकेसाठी शाहरुख पहिली निवड नव्हता. शाहरुखला ही भूमिका मिळण्यापूर्वी ती एका लोकप्रिय अभिनेत्याला ऑफर करण्यात आली होती.

‘दिवाना’ सिनेमातून शाहरुखचे नशीब चमकले. बॉलीवूडच्या एका अभिनेत्याने ‘दीवाना’ आणि ‘फूल और कांटे’ हे दोन्ही चित्रपट नाकारल्यामुळे शाहरुख खान व अजय देवगणसाठी खास ठरले. या चित्रपटांची ऑफर नाकारणारे अभिनेते म्हणजे अविनाश वाधवन. अनेक वर्षांनंतर त्यांनी याबाबत खुलासा केला आहे.

तरीही ‘दीवाना’ करावासा वाटला नाही -अविनाश वाधवन

दिग्दर्शक राज कंवर यांनी पहिल्यांदा ‘दीवाना’ चित्रपटासाठी अविनाश वाधवनांना ‘राजा’च्या भूमिकेची ऑफर दिली होती. याबाबत ‘हिंदी रश’ या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अविनाश म्हणाले, “राज कंवर यांनी मला ‘दीवाना’ सिनेमा करण्यासाठी खूप समजावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, माझ्या तारखांची अडचण होत होती. त्याचबरोबर ऋषी कपूर यांच्यानंतर आणि अर्धा सिनेमा झाल्यानंतर माझी एन्ट्री होणार होती, याबाबत मला थोडी शंका होती. ते मला म्हणाले होते, ‘ही खूप चांगली भूमिका आहे. चित्रपटाचं नावही तुझ्यावर आहे.’ पण तरीही मला सिनेमा करावासा वाटला नाही, कारण – त्याआधी केलेल्या एका सिनेमामध्ये मी एकटाच हिरो होतो.”

पुढे अविनाश म्हणाले, “त्यावेळी ‘दीवाना’ सिनेमा फक्त कागदावर होता. तो सुपरहिट ठरेल की नाही, याची काहीच खात्री नव्हती. राज कंवर चित्रपटाचं दिग्दर्शन किती उत्तम करतील हेही मला माहीत नव्हतं. पण, चित्रपट यशस्वी होणार की नाही हे कथेवर अवलंबून नसतं, तर दिग्दर्शक त्यात किती जीव ओततो, सिनेमातील गाणी कशी असतात आणि प्रेक्षकांना क्लायमॅक्स आवडतो का, यावर सिनेमाच यश ठरतं. आधी गोष्ट ऐकणं आणि ती नंतर पडद्यावर पाहणं, या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत.”

अविनाश म्हणाले, शाहरुख खानला ‘दीवाना’ मिळणं हे त्याच्या नशिबात होतं. तो उत्कृष्ट अभिनेता आहे. मलाही तो खूप आवडतो. आज तो जिथे आहे, तिथे पोहोचण्याचा त्याला पूर्णपणे अधिकार आहे आणि मी आज जिथे आहे, त्यालाही मीच जबाबदार आहे. कारण मी स्वःच्या पायावर दगड पाडून घेतला आणि फक्त एकदा-दोनदा नाही तर दहा वेळा मी चुकीचा निर्णय घेतला.”

अजय देवगणचा ‘फूल और कांटे’ सुद्धा नाकारलेला

याच मुलाखतीत अविनाश वाधवन यांनी आणखी एक मोठा खुलासा केला. ‘दीवाना’प्रमाणेच अजय देवगणने पदार्पण केलेला ‘फूल और कांटे’ हा चित्रपटही त्यांनी नाकारला होता. ते म्हणाले, “‘जुनून’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कुकू कोहली यांचे एक तरुण सहाय्यक दिग्दर्शक माझ्याकडे आले होते. त्यांचं नाव रोहित होतं. तो आजचा रोहित शेट्टीच आहे का, याची मला खात्री नाही.” विशेष म्हणजे, रोहित शेट्टी यांनी ‘फूल और कांटे’मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं आणि या चित्रपटापासून अजय देवगण व रोहित शेट्टी यांची जोडी जमली आणि त्यांनी एकत्र अनेक चित्रपट केले.”