कुठल्या कलाकाराचं नशीब कधी बदलेलं आणि कोणता चित्रपट रातोरात त्यांना स्टार बनवेल याची काही शास्वती नसते. असंच काहीसं झालेलं शाहरुख खानबरोबर. आज बॉलीवूडचा किंग खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुखच्या करिअरच्या सुरुवातीचा प्रवास खूप रंजक आहे. अनेकांना माहीत नसेल पण तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते जोसेफ विजय यांचं याच्याशी कनेक्शन आहे.
शाहरुख खानने पहिल्यांदा ‘दिवाना’ या चित्रपटातून मुख्य नायक म्हणून काम केलं होतं. ज्याचं दिग्दर्शन राज कंवर यांनी केलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. पण तुम्हाला माहीत आहे का हा चित्रपट तमिळ चित्रपटाचा रिमेक असून त्याचं दिग्दर्शन थलपती विजयचे वडील एस.ए चंद्रशेखर यांनी केलं होतं आणि निर्मिती त्यांच्या आई गायिका शोभा चंद्रशेखर यांनी केली होती.
असं आहे जोसेफ विजय यांचं या चित्रपटाशी कनेक्शन
या गोष्टीची सुरुवात निर्माता गुड्डू धनोआ यांच्यापासून झाली. १९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गोला बारूद’ या चित्रपटामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. त्यामुळे ते आपल्या कारकिर्दीला पुन्हा उभारी देणाऱ्या चित्रपटाच्या शोधात होते. ललित कपूर आणि राजू कोठारी यांच्याबरोबर ते नवीन प्रोजेक्टचा विचार करत होते. याच दरम्यान चेन्नईला गेले असताना तिघांनी तमिळ चित्रपट ‘वसंत रागम’ पाहिला. हा चित्रपट त्यांना इतका आवडला की त्याचा हिंदी रिमेक बनवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पुढे हाच रिमेक दिवाना या नावाने प्रेक्षकांसमोर आला.
विजय यांच्या वडिलांनी दिलेला नकार
सुरुवातीला चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी माधुरी दीक्षितचा विचार करण्यात आला होता. मात्र तारखांच्या अडचणींमुळे तिची निवड होऊ शकली नाही. त्यानंतर दिव्या भारतीची या भूमिकेसाठी निवड झाली. चित्रपटाची तयारी सुरू झाली असतानाच निर्मात्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली. मूळ तमिळ चित्रपटाचे दिग्दर्शक एस.ए चंद्रशेखर यांनी इतर कामांमध्ये व्यग्र असल्यामुळे ते या हिंदी रिमेकचं दिग्दर्शन करू शकणार नसल्याचं निर्मात्यांना कळवलं. त्यामुळे अचानक दिग्दर्शकाने नकार दिल्यानंतर मोठी अडचण निर्माण झाली होती.
यानंतर गुड्डू धनोआ यांनी राज कंवर यांच्याशी संपर्क साधला. ‘घायल’ या चित्रपटात त्यांनी राजकुमार संतोषी यांचे मुख्य सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. राज कंवर त्यांच्या पहिल्याच दिग्दर्शनाच्या संधीच्या शोधात होते. त्यामुळे त्यांनी हा चित्रपट स्वीकारला. यामुळे चित्रपटाला पुन्हा दिग्दर्शक मिळाला, मात्र अडचणींचा काळ अजून संपलेला नव्हता. पुढेही या चित्रपटासमोर अनेक आव्हाने उभी राहणार होती.
निर्णायक क्षण तेव्हा आला, जेव्हा गुड्डू धनोआ यांची दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याशी चर्चा झाली. कलाकारांच्या निवडीबाबत सुरू असलेल्या अडचणींबद्दल बोलताना शेखर कपूर यांनी एका तरुण दूरदर्शन अभिनेत्याचं नाव सुचवलं. ‘फौजी’ आणि ‘सर्कस’ यांसारख्या मालिकांमुळे तो अभिनेता लोकप्रिय झाला होता. तो अभिनेता म्हणजेच शाहरुख खान. पुढे याच चित्रपटामुळे शाहरुख खानच्या बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात झाली.
शाहरुख खानने दिलेला नकार
जेव्हा गुड्डू धनोआ आणि राज कंवर यांनी दिल्लीमध्ये शाहरुख खानची भेट घेतली, तेव्हा त्यांना समजलं की शाहरुखने आधीच पाच चित्रपट साइन केले होते. त्यामध्ये ‘दिल आशना है’, ‘किंग अंकल’, ‘कभी हा कभी ना’, ‘राजू बन गया जँटल मॅन’ आणि ‘चमत्कार’ यांचा समावेश होता. यामुळे शाहरुख खानकडे नवीन चित्रपटासाठी तारखा उपलब्ध नव्हत्या. म्हणून त्याने सुरुवातीला ‘दिवाना’ या चित्रपटाची ऑफर नाकारली.मात्र काही दिवसांनी परिस्थिती बदलली. शाहरुख खानच्या एका चित्रपटाचं चित्रीकरण पुढे ढकललं गेल्याने त्याच्या वेळापत्रकात काही दिवस त्याच्याकडे उरले होते जिथे त्याला कोणतंच काम नव्हतं म्हणून त्याने ‘दिवाना’ या चित्रपटाबाबत पुन्हा विचार केला आणि कथा ऐकण्यास होकार दिला.
…म्हणून शाहरुखने अखेर दिला होकार
कथा ऐकल्यानंतर शाहरुखला विशेषतः त्यांच्या व्यक्तिरेखेचा बंडखोर स्वभाव आणि कथेतला भावनिक प्रवास आवडला. तसंच विधवा पुनर्विवाहासारख्या संवेदनशील विषयाभोवती कथा गुंफण्यात आली होती. त्या काळातील हिंदी चित्रपटांमध्ये हा विषय फारसा हाताळला जात नव्हता. याच गोष्टींनी प्रभावित होऊन शाहरुख खानने अखेर चित्रपटात काम करण्यास होकार दिला. विशेष म्हणजे, शाहरुख खानने ‘दिवाना’ पूर्वी पाच चित्रपट साइन केले होते. तरीही सगळ्यात आधी हाच चित्रपट रिलीज झाला. २५ जून १९९२ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवलं. तो त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला. कमाईच्या बाबतीत तो केवळ ‘बेटा’ या चित्रपटानंतर दुसऱ्या क्रमांकावर होता. ‘दिवाना’च्या यशामुळे शाहरुख खानला हिंदी चित्रपटसृष्टीत चांगली ओळख मिळाली.
‘दिवाना’ प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून निर्माता गुड्डू धनोआ थक्क झाले होते. चित्रपटगृहांमध्ये शाहरुख खानची मोटारसायकलवरून एंट्री होताच प्रेक्षकांनी जोरदार जल्लोष केला. काही ठिकाणी पैसे उधळल्याच्या घटनाही घडल्याचं सांगितलं जातं. प्रेक्षकांचा हा प्रतिसाद एका नव्या स्टारच्या आगमनाची चाहूल देणारा होता. ‘दिवाना’च्या यशानंतर शाहरुख खानची लोकप्रियता झपाट्याने वाढली आणि पुढे तो हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या सुपरस्टार्सपैकी एक बनला.
‘दिवाना’च्या यशामुळे शाहरुख खानला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेता हा फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला. याच चित्रपटातून त्याच्या कारकिर्दीला मोठी दिशा मिळाली आणि पुढे त्याने हिंदी चित्रपटसृष्टीवर दीर्घकाळ अधिराज्य गाजवलं. आजही त्याची क्रेझ कायम आहे. या चित्रपटामुळे निर्माता गुड्डू धनोआ यांनाही इंडस्ट्रीत नवीन ओळख मिळाली. तसंच राज कंवर यांचंही नाव यशस्वी दिग्दर्शकांच्या यादीत समाविष्ट झालं. ‘दिवाना’ने केवळ एक नव्या स्टारला जन्म दिला नाही, तर निर्माता आणि दिग्दर्शक यांच्या कारकिर्दीलाही नवी उभारी दिली.
विशेष म्हणजे, ‘दिवाना’ प्रदर्शित होण्यापूर्वी निर्मात्यांना चित्रपटाचा शेवट बदलण्याचा सल्ला देण्यात आला होता. ज्येष्ठ दिग्दर्शक आणि चित्रपटाचे वितरक मनमोहन देसाई यांना असं वाटत होतं की, शेवटी काजलने (दिव्या भारती) शाहरुख खानच्या राजा या पात्राबरोबर राहण्याचा निर्णय प्रेक्षकांना पटणार नाही. त्यांच्या मते, ऋषी कपूर यांनी साकारलेला रवी हा काजलचा पहिला पती असल्याने तो परत आल्यानंतर काजलने त्याच्याबरोबर पुन्हा एकत्र यायला हवं होतं. इतकंच नव्हे, तर त्यांनी शाहरुख खानच्या पात्राचा मृत्यू दाखवून रवीला जिवंत ठेवण्याची सूचनाही दिली होती. मात्र निर्माता गुड्डू धनोआ आणि दिग्दर्शक राज कंवर यांना हे पटलं नाही. त्यांच्या मते काजल पुन्हा रवीकडे गेली असती तर चित्रपटाचा मुख्य संदेश विधवा असलेल्या स्त्रीयांच्या पुनर्विवाहाचा विषय कमकुवत झाला असता. म्हणूनच त्यांनी मूळ क्लायमॅक्स कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. अखेर चित्रपट आज प्रेक्षकांना ज्या शेवटासह परिचित आहे, त्याच शेवटासह प्रदर्शित झाला आणि तो प्रचंड यशस्वी ठरला.
