Hurun India Rich List 2026: नुकतीच २०२६ मधील हुरुन रीच लिस्ट जाहीर झाली आहे. गेल्या वर्षी या यादीत अभिनेता शाहरुख खान पहिल्या क्रमांकावर होता. आता यावर्षी तो कोणत्या स्थानी आहे, तसेच इतर कोणत्या कलाकारांनी या यादीत स्वत:चे स्थान निर्माण केले आहे, याबद्दल जाणून घेऊ..

शाहरुख खान ठरला भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता

शाहरुख खान २०२५ प्रमाणेच यावर्षीही या यादीत पहिल्या स्थानावर आहे. या रिपोर्टनुसार, बॉलीवूडच्या किंग खानची एकूण संपत्ती १० हजार कोटी इतकी आहे. शाहरुख खान अभिनयाबरोबरच त्याचा बिझनेस, रेड चिलीज एंटरटेनमेंट ही निर्माती संस्था, तसेच नाईट रायडर्स स्पोर्ट्स या माध्यमातून कमाई करतो.

हुरुन रीच लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर अमिताभ बच्चन आहेत. त्यांची एकूण संपत्ती ४००० कोटी आहे. या यादीत सलमान खान आणि हृतिक रोशन यांनीदेखील स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. सलमान खानची एकूण संपत्ती ३००० कोटी इतकी आहे, तर हृतिक रोशन २५०० हजार कोटींचा मालक आहे.

२०२६ च्या हुरुन रीच लिस्टमध्ये शाहरुख खान पहिल्या क्रमांकावर असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीची त्याची संपत्ती कमी आहे. यावर्षी त्याची संपत्ती १० हजार कोटी इतकी आहे, तर गेल्या वर्षी त्याची संपत्ती १२, ४९० कोटी इतकी होती. याच वर्षाच्या सुरुवातीला जाहीर झालेल्या हुरुन ग्लोबल रीच लिस्टमध्ये शाहरुखची संपत्ती १०,८०० कोटी असल्याचे नमूद केले होते.

शाहरुख खान (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)

अमिताभ बच्चन यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी त्यांची संपत्ती १,६३० कोटी होती. यावर्षी त्यांची संपत्ती ४,००० कोटी रुपये आहे. हृतिक रोशनच्या संपत्तीतसुद्धा यावर्षी वाढ झाल्याचे दिसत आहे. २,१६० कोटी रुपयांवरून आता त्याची संपत्ती २,५०० कोटी रुपये झाली आहे. त्याच्या HRX या ब्रँडमुळे त्याच्या संपत्तीत भर पडली आहे, तर सलमान खानच्या नावाचा या यादीत पहिल्यांदाच समावेश झाला आहे.

शाहरुख खान (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)

गेल्या वर्षीच्या यादीत जुही चावला आणि करण जोहर यांचाही समावेश होता. जुही चावलाची संपत्ती ७,७९० कोटी रुपये, तर करण जोहरची संपत्ती १,८८० कोटी रुपये असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, या वर्षीच्या यादीत दोघांचाही समावेश नाही.

शाहरुख खान (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)

या कलाकारांबरोबरच ‘रामायण’चे निर्माते नमित मल्होत्रा यांचे वडील नरेश मल्होत्रा यांचाही हुरुन इंडिया रीच लिस्ट २०२६ मध्ये समावेश आहे. त्यांची संपत्ती १६,००० कोटी रुपये इतकी असल्याचे समोर आले आहे.