Shah Rukh Khan not Visit Kashmir Father Promise: बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानने त्याच्या जिद्द आणि मेहनतीने सिनेविश्वामध्ये यश मिळवले आहे. फक्त भारतामध्येच नाही, तर इतर देशांतही त्याचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. शाहरुख खान संपूर्ण जग फिरला असला तरी असे एक ठिकाण आहे, जिथे जाणे त्याने कायम टाळले. त्याबद्दल त्याने बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर झालेल्या संवादामध्ये स्वतः खुलासा केला होता.

शाहरुख खान एकदा ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये सहभागी झाला होता. अमिताभ बच्चन यांना शाहरुख नेहमीच वडिलांप्रमाणे मानतो. स्वत:च्या आयुष्यातील अनेक खुलासे त्याने बिग बींसमोर केले आहेत. विविध देश फिरणारा शाहरुख हा निसर्गसौंदर्याने नटलेल्या काश्मीरमध्ये कधीच गेला नव्हता. वडिलांशी जोडल्या गेलेल्या एका भावनिक कारणामुळे त्याने पृथ्वीवरचा स्वर्ग मानल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये न जाण्याचे निश्चित केले होते.

वडिलांना दिलेल्या वचनामुळे शाहरुखने काश्मीरला जाणे टाळले

शाहरुखने काश्मीरमध्ये कधीच न जाण्याबद्दलचा भावनिक किस्सा सांगितला होता. अनेकदा शूटिंगमुळे तिथे जाण्याची वेळ त्याच्यावर आली होती; पण प्रत्येक वेळी त्याने ती टाळली. कुटुंब, मित्रांबरोबर त्याला जाण्याची संधी आली होती. तसेच कार्यक्रमांसाठीसुद्धा शाहरुखला काश्मीरमध्ये बोलावले जात होते; पण वडिलांना दिलेल्या एका वचनामुळे तो कायम काश्मीरला जाणे टाळत होता.

केबीसीच्या सेटवर शाहरुख म्हणाला, “अमितजी, ही खूप भावनिक गोष्ट आहे. माझ्या वडिलांची आई काश्मिरी होती. वडिलांनी मला सांगितले होते की, मी जगलो किंवा नाही, तरी आयुष्यात तीन ठिकाणं तू नक्कीच पाहिली पाहिजेस. एक म्हणजे इस्तंबूल बघ, इटली-रोम बघ आणि काश्मीर बघ. ही दोन्ही ठिकाणे माझ्याशिवाय बघ; पण काश्मीर माझ्याशिवाय बघू नकोस.”

पुढे शाहरुख म्हणाला, “पण दुर्दैवानं झालं असं की, ते आम्हाला खूप लवकर सोडून गेले. त्यामुळे काश्मीर बघायचं राहिलं होतं. मी संपूर्ण जगभर फिरलोय; पण मी काश्मीरला गेलो नाही.” शाहरुख खानच्या वडिलांनी त्याला त्यांच्याशिवाय काश्मीरला जाऊ नये, असे सांगितले होते. त्यामुळे अनेकदा संधी येऊनही आणि सहलीचा प्लॅन करूनही तो काश्मीरला जाणे कायम टाळत होता.”

‘या’ सिनेमाच्या शूटिंगवेळी पहिल्यांदाच काश्मीरला गेला शाहरुख

मात्र, पुढे दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या ‘जब तक है जान’ या सिनेमाच्या शूटिंगसाठी शाहरुखला काश्मीरला जावे लागले होते. त्याच निमित्ताने त्याने पहिल्यांदाच काश्मीर पाहिले आणि वडिलांची अपूर्ण राहिलेली इच्छा एका वेगळ्या पद्धतीने पूर्ण झाली. विशेष म्हणजे, ‘जब तक है जान’ हा यश चोप्रांचा शेवटचा सिनेमा ठरला. शाहरुखसाठी काश्मीरचा हा प्रवास अत्यंत भावनिक आणि खास ठरला होता.