Shah Rukh Khan King Movie Cast : शाहरुख खानने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. चॉकलेट बॉय ते अॅक्शन हिरो अशा विविध भूमिका साकारत तो घराघरांत पोहोचला. त्याने त्याच्या सहज सुंदर अभिनयाने अनेकांच्या मनावर राज्य केलं आणि अजूनही तो इंडस्ट्रीत सक्रिय आहे. अभिनेत्याला गेल्या वर्षीच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. अशातच आता शाहरुख खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या ‘किंग’ या बुहप्रतीक्षित चित्रपटामुळे चर्चेत आहे.

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली. हा एक अॅक्शन चित्रपट असल्याचं त्याच्या पोस्टरवरून कळतं. शाहरुख खान यामध्ये मुख्य भूमिकेत असून त्याच्यासह या चित्रपटात बॉलीवूडमधील बडे कलाकारही पाहायला मिळणार आहेत. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित आणि शाहरुख खान अभिनीत ‘किंग’ या चित्रपटात शाहरुख खान व त्याची लेक सुहाना खान प्रथमच एकत्र झळकणार आहेत. ‘द अर्चिज’मध्ये काम केल्यानंतर सुहाना यामधून पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, त्यामुळे ‘किंग’ चित्रपटातून शाहरुख खानबरोबर त्याची लेकही झळकणार असल्याने या बाप-लेकीच्या जोडीला एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

याव्यतिरिक्त ‘किंग’ चित्रपटात शाहरुख खानसह बॉलीवूडमधील अनेक लोकप्रिय कलाकार विशेष करून अभिनेत्री झळकणार आहेत. अभिनेते सौरभ शुक्ला यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत चित्रपटाबद्दल सांगितलं आहे. यावेळी त्यांनी चित्रपटात कोणते कलाकार झळकणार आहेत याबद्दल सांगितलं आहे. यावेळी त्यांनी किंगमध्ये अर्ध्याहून जास्त बॉलीवूड झळकणार असल्याचं म्हटलं आहे. हिंदी रशशी संवाद साधताना सौरभ शुक्ला म्हणाले, “फक्त मीच नाही तर चित्रपटात ७० टक्के बॉलीवूड आहे. यात अनेक मोठे कलाकार झळकणार आहेत.”

Award Banner

सौरभ यांनी यावेळी चित्रपटात काम करण्याचा त्यांचा अनुभवही सांगितला आहे. त्यांनी यावेळी चित्रपटात काम करताना त्यांना खूप मज्जा आली, यातील त्यांनी साकारलेलं पात्र प्रेक्षकांच्या लक्षात राहणारं असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी शाहरुख खानचं कौतुकही केलं.

चित्रपटात कोणते कलाकार झळकणार?

माध्यमांच्या वृत्तानुसार शाहरुख खानच्या ‘किंग’ चित्रपटात सुहाना खान, दीपिका पादुकोण महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार आहेत. याव्यतिरिक्त चित्रपटात राणी मुखर्जी, अभिषेक बच्चन, अनिल कपूर, अरशद वारसी, जॅकी श्रॉफ, जयदीप अहलावत, राघव जुयाल यांसारखे इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकार झळकणार आहेत. हा चित्रपट २४ डिसेंबर २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे.