शाहरुख खान बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अभिनेता नेहमी कुठल्या न कुठल्या कारणामुळे चर्चेत असतो. शाहरुख खान बॉलीवूडमधील श्रीमंत सेलिब्रिटींपैकी एक आहे. अशातच आता समोर आलेल्या माहितीनुसार शाहरुख खान बॉलीवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेता बनला आहे.

शाहरुख खान त्याच्या चित्रपटांसाठी कोट्यवधींमध्ये मानधन घेतो; तर त्याच्याकडे कोट्यवधींची मालमत्ताही आहे. समोर आलेल्या ‘हरुण ग्लोबल रिच लिस्ट’नुसार शाहरुख खान जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक ठरला आहे. ५ मार्च रोजी ही यादी जाहीर झालेली. ३०८ अब्जाधीशांसह भारत या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

शाहरुख खानची नेटवर्थ

या यादीतील माहितीनुसार अभिनेत्याची नेटवर्थ १०,८०० कोटी इतकी आहे. यामुळे तो जगातील सर्वाधिक श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक ठरतो. या यादीत इतर सेलिब्रिटींमध्ये संगीत क्षेत्रातील दिग्गज Jay-Z (२.८ अब्ज अमेरिकन डॉलर), टेलर स्विफ्ट (१.६ अब्ज अमेरिकन डॉलर) आणि रिहाना(१.५ अब्ज अमेरिकन डॉलर) यांचा समावेश आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातील दिग्गज मायकेल जॉर्डन (३.६ अब्ज अमेरिकन डॉलर) आणि टायगर वूड्स (१.९ अब्ज अमेरिकन डॉलर) यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे.

शाहरुख खान पुन्हा एकदा या यादीत स्थान मिळवण्यात यशस्वी झाला असला तरी यावेळी त्याच्या संपत्तीत किंचित घट झाली आहे. गेल्या वर्षी त्याची संपत्ती तब्बल १२,४९० कोटी रुपये म्हणजेच सुमारे १.४ अब्ज डॉलर इतकी असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.गेल्या वर्षी शाहरुख खानची संपत्ती टेलर स्विफ्ट हिच्यापेक्षाही जास्त होती. २०२५ मध्ये टेलर स्विफ्टची एकूण संपत्ती सुमारे १.३ अब्ज डॉलर इतकी होती. मात्र, यावर्षी टेलर स्विफ्ट ही शाहरुख खानपेक्षा पुढे आहे.

शाहरुख खानबरोबर रणबीर कपूर अभिनीत ‘रामायण’ चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रा यांचाही या यादीत समावेश झाला आहे. त्यांनी यावर्षी या यादीत पहिल्यांदाच स्थान मिळवलं असून, त्यांची अंदाजे संपत्ती १ अब्ज डॉलर (सुमारे ९,२०४ कोटी रुपये) इतकी असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, मुकेश अंबानी हे ९.८ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह अजूनही भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत आणि जागतिक स्तरावर त्यांचा क्रमांक १७ वा आहे, तर गौतम अदानी हे ७.५ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून जागतिक स्तरावर त्यांचा क्रमांक २३ वा आहे.