Shah rukh Khan Viral Video : शाहरुख खान बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. शाहरुख त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त मिळून मिसळून राहण्याच्या स्वभवासाठीसुद्धा ओळखला जातो. अभिनेता अनेकदा यामुळे चर्चेतही असतो. अनेक जण त्याचे अनेक किस्से सांगत कौतुक करत असतात. अशातच आता अभिनेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर अनेक जण कमेंट करुन त्याचं कौतुक करत आहेत.

शाहरुख खानचा सध्या एक २४ वर्षांपूर्वीचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या व्हायरल व्हिडीओवर त्याच्या अनेक चाहत्यांनी कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे. खरंतर यामागचं कारणही तसंच आहे. अभिनेता या व्हिडीओमध्ये त्याची पत्नी गौरी खान व मुलगा आर्यन खान आणि लेक सुहाना खानसह त्याच्या नवीन निर्मिती संस्थेसाठी पूजा करताना दिसत आहे. 

२४ वर्षांपूर्वी सुरू केलेली निर्मिती संस्था

२४ वर्षांपूर्वी शाहरुख खान व गौरी खान यांनी ७ मे  २००२मध्ये त्यांची निर्मिती संस्था रेड चिलीज एंटरटेनमेंट सुरू केली होती. यामार्फत आतापर्यंत अनेक चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत असून यामुळे शाहरुख खानचं कौतुक होण्यामागचं कारण म्हणजे शाहरुख मुस्लीम आहे, पण त्याची पत्नी गौरी हिंदू आहे. दोघेही एकमेकांच्या संस्कृतीमधील सणवार आनंदाने एकत्र साजरे करताना दिसतात. सोशल मीडियावरही त्याचे फोटो दोघे पोस्ट करत असतात. दोघेही सर्वधर्मसमभाव या विचाराचे असल्याचे त्यांनी विशेषकरुन शाहरुखनेही मुलाखतींमधून सांगितलेलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये शाहरुख खान  त्याच्या कुटुंबीयांसह हिंदू रितीरिवाजानुसार पूजा करत त्याच्या प्रोडक्शन हाऊसचं उद्घाटन करताना दिसत आहे. त्यामुळेच या व्हिडीओखाली त्याच्या चाहत्यांनी ‘तो किती चांगला आहे, धर्माकडे पाहण्याचा त्याच्या दृष्टीकोणही सुंदर आहे’, ‘भारतीय एकतेचं खरं उदाहरण’, ‘शाहरुख खान आध्यात्मिक आहे आणि तो सर्व धर्म, संस्कृतीचा आदर करतो’ अशा कमेंट्स करत त्याचं कौतुक केलं आहे.

दरम्यान, शाहरुख खानच्या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये ‘डंकी’, ‘जवान’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. अलीकडेच त्याची निर्मिती असलेली ‘कर्तव्य’ ही सीरिज रिलीज झाली आहे. यामध्ये अभिनेता सैफ अली खान प्रमुख भूमिकेत आहे.