बॉलीवूड स्टार होण्याच्या आणि नंतर गायक निक जोनसशी लग्न करण्याच्या अनेक वर्षांआधी प्रियांका चोप्राला शाहरुख खानने लग्नाबाबत एक प्रश्न विचारला होता. हा किस्सा २००० सालचा आहे. त्यावेळी १७ वर्षांची प्रियांका मिस इंडिया स्पर्धेत सहभागी झाली होती आणि शाहरुख खान या स्पर्धेच्या परीक्षकांपैकी एक होता.
प्रश्नोत्तराच्या फेरीत शाहरुख खानने प्रियांकासमोर तीन पर्याय ठेवले. यामध्ये भारतीय क्रीडापटू, श्रीमंत व्यावसायिक किंवा स्वतः शाहरुखसारखा हिंदी चित्रपटातील सुपरस्टार असे तीन पर्याय होते. प्रियंकाने दिलेल्या उत्तरावर प्रेक्षकांनी जोरदार दाद दिली. या स्पर्धेत ती फर्स्ट रनरअप (प्रथम उपविजेती) ठरली. त्यानंतर तिने २००० साली मिस वर्ल्डचा किताब जिंकला.
शाहरुख खानने प्रियांका चोप्राला विचारला होता लग्नाबाबत प्रश्न
प्रियांकाला प्रश्न विचारण्याआधी शाहरुख खानने सौंदर्याच्या उपस्थितीत आपणही किती घाबरलेलो होतो, अशी मिश्कील टिप्पणी केली. तो म्हणाला, “मीही तुमच्याइतकाच घाबरलो आहे.” यानंतर त्याने प्रियांकाला विचारलं, “समजा, तुम्हाला यापैकी कोणाशी लग्न करायचं असेल, तर तुम्ही कोणाची निवड कराल?” यामध्ये त्याने भारतीय क्रीडापटू, श्रीमंत व्यावसायिक आणि स्वतःसारखा हिंदी चित्रपटातील सुपरस्टार असे तीन पर्याय दिले. शाहरुखने उदाहरण देताना भारतीय क्रीडापटू म्हणून मोहम्मद अझहरुद्दीन यांचा उल्लेख केला. असा क्रीडापटू प्रियंकाला जगभर फिरवेल, देशाचा अभिमान वाढवेल, असं त्याने म्हटलं. दुसरा पर्याय त्याने स्वारोवस्की (Swarovski)सारख्या कठीण नावाच्या व्यावसायिकाचा दिला, जो तिला दागिने आणि महागडे नेकलेस देईल, असं तो मिश्कीलपणे म्हणाला. तिसरा पर्याय स्वतःचा देताना शाहरुख म्हणाला की, “माझ्यासारखा हिंदी चित्रपटातील स्टार, ज्याच्याकडे माझ्यासारखा लग्नाबाबत असा गुंतागुंतीचा प्रश्न विचारण्याशिवाय दुसरं काही चांगलं काम नाही.” त्यानंतर शाहरुखने प्रियंकाला आश्वासन दिलं की तिने कोणताही पर्याय निवडला तरी त्याने तिला दिलेल्या गुणांवर त्याचा परिणाम होणार नाही.

“तुम्ही उत्तर देण्याआधी मी तुम्हाला सांगतो की, तुमचं उत्तर काहीही असलं तरी त्याचा मी तुम्हाला दिलेल्या गुणांवर कोणताही परिणाम होणार नाही. मला खात्री आहे की अझहर भाई आणि स्वारोवस्कीलाही याना काही वाटणार नाही,” असं शाहरुख पुढे म्हणाला. यानंतर प्रियांका चोप्राने भारतीय क्रीडापटूची निवड केली प्रियांकाने श्रीमंत व्यावसायिक किंवा बॉलीवूड सुपरस्टारची निवड केली नाही. तिने भारतीय क्रीडापटूची निवड केली आणि त्यामागचं कारणही सांगितलं. ती म्हणाली, “या तीन कठीण पर्यायांपैकी मला एकाची निवड करायची असेल, तर मी एका महान भारतीय क्रीडापटूची निवड करेन. कारण जेव्हा मी घरी परत येईन, तेव्हा मी त्याला पाठिंबा देण्यासाठी त्याच्याबरोबर असेन आणि भारताला जसा त्याचा अभिमान आहे, तसाच मलाही त्याचा अभिमान आहे, हे त्याला सांगू शकेन.” प्रियांका पुढे म्हणाली, “त्याला तुम्ही तुमचं सर्वोत्तम दिलंत आणि तुम्हीच सर्वोत्कृष्ट आहात असं सांगता येणं माझ्यासाठी महत्त्वाचं असेल. माझ्या देशाला इतका अभिमान वाटावा, अशी कामगिरी करणारा माझा पती असेल, तर मला त्याचा खूप अभिमान वाटेल. खूप खूप धन्यवाद.”

मिस इंडिया स्पर्धेतील या भेटीनंतर काही वर्षांनी शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा सहकलाकार म्हणून एकत्र आले. २००६ मध्ये फरहान अख्तर दिग्दर्शित ‘डॉन’ चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं. या चित्रपटात शाहरुखने डॉनची भूमिका साकारली होती, तर प्रियांका का रोमाच्या भूमिकेत दिसली होती. यानंतर २०११ मध्ये ‘डॉन २’मध्ये दोघे पुन्हा एकत्र आले. मिस इंडिया स्पर्धेतील त्यांचा हा जुना किस्सा आजही विशेष ठरतो. त्यावेळी प्रियांका चित्रपटसृष्टीत आलेली नव्हती. मात्र, किशोरवयीन सौंदर्यवती प्रियांकाने शाहरुखसारख्या सुपरस्टारशी लग्न करण्याचा काल्पनिक पर्याय नाकारत, देशाचा अभिमान वाढवणाऱ्या क्रीडापटूची निवड केली होती.
