Shahrukh Khan & Madhuri Dixit Movie : हिंदी सिनेसृष्टीत असे अनेक चित्रपट आहेत ज्यामध्ये मोठे कलाकार एकत्र झळकले होते. परंतु, तरी त्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळालं नाही. यापैकीच एक म्हणजे धक धक गर्ल माधुरी दीक्षित आणि शाहरुख खान यांचा ‘हम तुम्हारे है सनम’ हा चित्रपट.

शाहरुख खान व माधुरी दीक्षित प्रमुख भूमिकांमध्ये असलेल्या ‘हम तुम्हारे है सनम’ या चित्रपटात बॉलीवूड अभिनेता सलमान खानसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत होता. के.एस. अधियामन (K.S. Adhiyaman) यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. परंतु, इतकी मोठी स्टारकास्ट असूनही या चित्रपटाला फार चांगला प्रतिसाद मिळाला नाही. महत्त्वाचं म्हणजे चित्रपटासाठी शाहरुख खान व इतर कलाकार मंडळींना निर्मात्यांनी तयार केलं होतं. हा एका तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे. 

…म्हणून शाहरुख खानने दिलेला होकार

‘जनसत्ताच्या वृत्तानुसार शाहरुख खानने हा चित्रपट साइन करण्यापूर्वी मूळ तमिळ चित्रपट पाहिला होता. चित्रपट पाहिल्यानंतर त्याने स्पष्ट सांगितलं होतं की, अशा प्रकारची कथा त्याला फारशी समजत नाही. मात्र निर्मात्याबरोबरच्या नात्यामुळे त्याने हा चित्रपट करण्यास होकार दिला.

निर्मात्यांनी शाहरुख खानला या चित्रपटासाठी सुमारे २ कोटी रुपयांची ऑफर दिली होती, जी त्या काळातील त्याच्या मानधनापेक्षाही जास्त होती. या चित्रपटासाठी शाहरुखला जवळपास २० दिवस काम करायचं होतं. तर सलमान खान सलीम खान यांच्या सांगण्यावरून या चित्रपटाशी जोडलेला. विशेष म्हणजे, सलमानला चित्रपटाची पूर्ण कथा सांगितली नव्हती. फक्त हा एका तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे, एवढीच माहिती देण्यात आली होती. 

‘या’ कारणामुळे नाकारलं मानधन

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करू शकला नाही. सुमारे १२ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जवळपास १३.५ कोटी रुपयांची कमाई केली. या काळात निर्मात्यांकडे शाहरुख खानचे सुमारे ९५ लाख रुपये बाकी होते. मात्र इथेच शाहरुख खानने त्याचा मोठेपणा दाखवला. त्याने उरलेले ९५ लाख रुपये घेण्यास स्पष्ट नकार दिला. एखाद्या लग्नसमारंभात परफॉर्म करूनही तो इतके पैसे कमवू शकतो. पण, निर्मात्यांना हे पैसे देण्यासाठी स्वतःची मालमत्ता विकावी लागू शकते. असं म्हणत त्याने हे पैसे घेण्यास नकार दिला