शाहरुख खानने अनेकदा त्याचं कुटुंब त्याच्यासाठी किती महत्त्वाचं आहे याबद्दल सांगितलं आहे. त्यामुळे २०२१ मध्ये त्याचा मुलगा आर्यन खानला अटक झाल्याचा प्रसंग हा त्याच्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळ होता, यात शंका नाही. आर्यन खानचे वकील मुकुल रोहतगी यांचा एक जुना व्हिडीओ आता समोर आला आहे. यात त्यांनी शाहरुख खानने स्वतः फोन करून आर्यनची केस लढण्याची विनंती कशी केली, याबद्दल सांगितलं आहे.
२०२५ मध्ये ‘रिपब्लिक टीव्ही’ला दिलेल्या जुन्या मुलाखतीत रोहतगी यांनी आठवण सांगितली की, सुरुवातीला आर्यनची बाजू मांडण्याचा त्यांचा अजिबात विचार नव्हता. त्यावेळी ते सुट्टीसाठी यूकेमध्ये होते. शाहरुखचा फोन आल्यानंतरही या प्रकरणाचं मोठं हाय-प्रोफाइल स्वरूप लक्षात घेता, ही केस हातात घेण्याची त्यांची इच्छा नव्हती, असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, “माझ्या मते हे नियमित जामिनाचं प्रकरण होतं आणि मी अशी हजारो प्रकरणं हाताळली आहेत. फक्त या प्रकरणातील व्यक्ती महत्त्वाची असल्यामुळे सगळ्यांचं लक्ष त्याकडे होतं. थोडक्यात सांगायचं तर, त्यावेळी मी यूकेमध्ये सुट्टीवर होतो आणि तो कोरोनाचा काळ होता.”
लेकासाठी शाहरुख खानने वडिलांकडे केलेली विनंती
रोहतगी यांनी पुढे सांगितलं की, शाहरुखने त्यांच्याशी संपर्क साधून आर्यनची केस लढण्याची विनंती केली. मात्र, रोहतगी यांनी सुरुवातीला नकार दिला. त्यानंतर शाहरुखने त्यांच्या पत्नीशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. रोहतगी आठवण सांगताना म्हणाले, “खान साहेबांनी माझा नंबर मिळवला आणि मला फोन केला. मी त्यांनाही तेच सांगितलं की, मला ही केस लढायची नाही. त्यानंतर ते म्हणाले, मी तुमच्या पत्नीशी बोलू शकतो का? मी म्हटलं,नक्की.” पुढे रोहतगी यांनी सांगितलं की, शाहरुखने त्यांच्या पत्नीशी भावनिक संवाद साधला. “त्यांनी तिला आपली व्यथा सांगितली. याकडे क्लायंट म्हणून पाहू नका, मी एक वडील आहे, असं ते म्हणाले. अशा काही गोष्टी त्यांनी सांगितल्या,” अशी आठवण रोहतगी यांनी सांगितली.
रोहतगी यांच्या पत्नीने अखेर त्यांना मुंबईला जाऊन आर्यनची केस हातात घेण्यास सांगितलं. त्याबद्दल सांगताना ते म्हणाले, “साहजिकच, शाहरुखला याचा खूप त्रास होत होता. त्यामुळे माझी पत्नीही म्हणाली,तुम्ही जायला हवं. मी तिला म्हणालो, तू मला कोरोनाच्या काळात काळजी घे असं सांगतेस आणि आता मात्र मला एवढा प्रवास करून केस लढवून यायला सांगतेस.” रोहतगी यांनी पुढे सांगितलं की, शाहरुखने त्यांना मुंबईला जाण्यासाठी खासगी विमानाची (प्रायव्हेट जेट) सोय करून देण्याची ऑफर दिली होती. मात्र, रोहतगी यांनी प्रायव्हेट जेटने न जाता व्यावसायिक विमानाने (कमर्शियल फ्लाइट) मुंबई गाठण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी शाहरुखची भेट घेतली. ते म्हणाले, “खान साहेबांनी माझ्यासाठी प्रायव्हेट जेटची व्यवस्था करण्याची ऑफर दिली होती, पण मी ती घेतली नाही. मला छोट्या विमानांमधून प्रवास करायला फारसं आवडत नाही. त्यामुळे मी मुंबईला फ्लाइटने आलो. शाहरुखने स्वतः मी नेहमी ज्या हॉटेलमध्ये राहतो, त्याच हॉटेलमध्ये मुक्काम केला होता. ते हॉटेल म्हणजे नरीमन पॉइंटमधील ट्रायडंट.”
रोहतगी यांनी पुढे सांगितलं की, शाहरुख या संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेत बारकाईने सहभागी होता. सुनावणीपूर्वी त्याने स्वतः काही मुद्दे आणि नोट्स तयार केल्या होत्या. वकिलांनी तयार केलेल्या मुद्द्यांबरोबर त्याने या प्रकरणावर रोहतगी यांच्याशी चर्चाही केली होती. “मला तो खूप उत्सुक आणि हुशार वाटला. वकिलांव्यतिरिक्त त्याने स्वतःही अनेक नोट्स आणि मुद्दे तयार केले होते. त्याने माझ्याशी त्यावर चर्चा केली आणि त्यानंतर आम्ही युक्तिवाद केला. जवळपास अडीच किंवा तीन दिवस युक्तिवाद सुरू होता आणि अखेर जामीन मंजूर झाला. त्यानंतर मी माझी उरलेली सुट्टी घालवण्यासाठी लगेच इंग्लंडला परतलो. अशा प्रकारे हे सगळं घडलं,” अशी आठवण मुकुल रोहतगी यांनी सांगितली.
ऑक्टोबर २०२१ मध्ये मुंबईजवळून जाणाऱ्या ‘कॉर्डेलिया एम्प्रेस’ क्रूझवरील एका पार्टीवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) छापा टाकला होता. यावेळी आर्यन खान, त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि इतर काही जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणामुळे आर्यनच्या अटकेची मोठी चर्चा झाली. जामीन मिळण्यापूर्वी आर्यनला तीन आठवड्यांहून अधिक काळ तुरुंगात राहावं लागलं. त्यानंतर NCBने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये आर्यनचं नाव नव्हतं. त्यामुळे या प्रकरणातील त्याच्यावरील सर्व आरोपांमधून त्याची सुटका झाली. या प्रकरणानंतर आर्यनने २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या नेटफ्लिक्स सीरिजमधून दिग्दर्शक म्हणून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.
