शाहरूख खान आणि अभिनेत्री मीता वशिष्ठ यांनी १९९२ मध्ये मणी कौल यांच्या ‘द इडियट’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यानंतर १९९८ मध्ये मणी रत्नम यांच्या ‘दिल से’ चित्रपटात ते पुन्हा एकत्र आले. ‘स्क्रीन’ला दिलेल्या मुलाखतीत मीताने सांगितलं की, ‘दिल से’च्या शूटिंगदरम्यान शाहरूखने स्वतःचा जीव धोक्यात घालून तिला वाचवलं होतं.
मीता शाहरुख खानबद्दल म्हणाली, “आम्ही १९९२ मध्ये मणी कौल यांच्या ‘द इडियट’मध्ये एकत्र काम केलं होतं. तेव्हा तो सुपरस्टार नव्हता, पण त्याच्या व्यक्तिमत्त्वाची जादू दिसत होती. मोठा स्टार बनण्याची त्याची इच्छा आणि जिद्द स्पष्ट जाणवायची.”
‘दिल से’ची आठवण सांगत मीता म्हणाली, “या सिनेमाच्या वेळी परिस्थिती वेगळी होती. तोपर्यंत तो खूप मोठा स्टार झाला होता, तरीही तो खूप नम्र होता. डॅलहौसीमध्ये शूटिंगसाठी पोहोचल्यावर तो मला जुन्या मित्रासारखा भेटला. तो मोठा स्टार झालाय, त्यामुळे त्याचा स्वभाव बदलला असेल का, असं मला वाटायचं, म्हणून मी थोडे अंतर ठेवून होते. पण तो अत्यंत प्रेमाने वागला आणि शूटिंगदरम्यान त्याने माझी खूप काळजी घेतली. दुर्दैवाने, आमचा एकत्र असलेला सर्वात छान भाग चित्रपटातून हटवण्यात आला होता.
शाहरुख खान व मीता वशिष्ठ यांचा फाईट सीक्वेन्स
मीता व शाहरुखचा सहा मिनिटांचा एक फायटिंग सीक्वेन्स चित्रपटातून काढून टाकण्यात आला होता. त्यात दोघांची जबरदस्त फाईट दाखवली होती. या सीक्वेन्समधील शेवटचा टप्पा म्हणजे मीताला एक लहान दगड मारून शाहरुखला जखमी करायचं होतं. पण तो दगड तिच्या हातातून निसटला आणि खरंच शाहरुखच्या डोक्याला जखम झाली. सर्वजण घाबरले पण शाहरुख खूप प्रेमाने वागला. मीताला दुखापत होऊ नये याची काळजी घेऊन तो सीन करायचा.

शाहरुख खानने वाचवला मिताचा जीव
पुढे मीता म्हणाली, “एका सीनमध्ये मी एक एके-४७ बंदूक हातात घेऊन त्याला डोळ्यांवर पट्टी बांधून पुढे नेत होते. आम्ही डॅलहौसीमध्ये शूट करत होतो आणि तिथे प्रचंड थंडी होती. आम्ही घातलेल्या बुटांचे सोल प्लास्टिकचे होते, ज्यामुळे जमिनीवर चालताना अंदाज येत नव्हता. मणी सर सतत सांगत होते, “मागे जा, मागे जा.” त्यामुळे मी अत्यंत हळूहळू मागे जात होते. पण एका क्षणी मला अचानक आकाश दिसू लागलं आणि मी पडतेय, असं जाणवलं. मी खरोखरच एका उतार असलेल्या कठड्यावर होते आणि पडणार होते. पण शाहरूखने एका सेकंदाच्या आत माझं जॅकेट पकडून मला वर ओढलं. एका क्षणी मी हातात बंदूक घेऊन मागे पडणार होते, पण त्याने मला सुखरुप बाहेर काढलं. त्याने त्या दिवशी खरंच माझा जीव वाचवला. बंदुकीचे वजन आणि त्या उतारामुळे मी सरळ खाली पडले असते आणि मला वाचवणारं कोणी नव्हतं. शाहरुखमुळे तो अनर्थ टळला.”
