५ एप्रिल रोजी मुंबईत ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स २०२६’ होणार आहेत. त्यानिमित्ताने आपण या पुरस्कार सोहळ्याच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहोत. २०१० च्या स्क्रीन अवॉर्ड्समध्ये एक किस्सा घडला होता. शाहरुख खान व शाहीद कपूर यांनी रेखा यांच्याबरोबर मस्ती केली होती.
शाहरुख आणि शाहिदने रेखा यांच्याबरोबर डान्स करून या मजेशीर सेगमेंटची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी रेखा यांच्या सौंदर्याचे आणि अदांचे भरभरून कौतुक केले होते. कौतुक केल्यानंतर शाहरुख खानने रेखा यांना त्यांच्या आवडत्या अभिनेत्यांची नावं विचारली. मध्येच थांबवत शाहीद पटकन म्हणाला, “तुमच्या आवडत्या रोमँटिक अभिनेत्यांची नावं.” त्यावर शाहरुखने शाहीदची फिरकी घेतली होती. “बाळा, तू तर फार बोलतोय,” असं म्हटलं होतं.
रेखा यांनी नंतर त्यांच्या आवडत्या रोमँटिक अभिनेत्यांची एक लांबलचक यादीच वाचून दाखवली. त्या म्हणाल्या, “सर्वात आधी मी दिलीप कुमार यांचे नाव घेईन. ते कमालीचे रोमँटिक आहेत. त्यानंतर देव आनंद, राज कपूर, शम्मी कपूर, शशी कपूर, रणधीर कपूर, ऋषी कपूर, जितेंद्र, धर्मेंद्र, संजीव कुमार, राजेश खन्ना, विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा…” रेखा अजून नावं घेत असतानाच शाहरुखने त्यांना मध्येच अडवलं आणि म्हटलं, “मला वाटतं तुम्ही कोणाचं तरी नाव विसरलात.” यामुळे सोहळ्यात क्षणभर शांतता पसरली होती.
पाहा मजेशीर व्हिडीओ
शाहीद म्हणालेला, “आमच्या पिढीतील कोणाचं तरी नाव तुम्ही विसरला आहात.” रेखा म्हणालेल्या, “वयातील अंतरामुळे मी कदाचित विसरले असेन.” त्यावर शाहरुख गंमतीने म्हणालेला, “पण तुम्ही तर १८ वर्षांच्या आहात,” त्याने रेखा यांच्या ‘अठरा बरस की तू होने को आई रे’ या प्रसिद्ध गाण्याचा संदर्भ दिला होता.
शाहरुखने पुढे रेखा यांना आठवण करून दिलेली की, त्या त्याचं आणि शाहीदचं नाव घ्यायला विसरल्या आहेत, कारण ते दोघेही त्यांचे खूप मोठे चाहते आहेत. रेखा म्हणालेल्या, “माझे तर खूप चाहते आहेत.” त्यानंतर शाहरुखने म्हटलेलं की, त्यांनी त्यांच्या हृदयावर ऑटोग्राफ द्यावा आणि रेखा यांनी शाहरुख आणि शाहीदच्या छातीवर ऑटोग्राफ देण्याचा अभिनय केला. या मजेशीर गप्पांनंतर, रेखा यांनी शाहरुख आणि शाहीदला डान्स करण्यासाठी आग्रह केला होता, मग ते दोघेही मंचावर रेखा यांच्याबरोबर थिरकले होते.
