Shah Rukh Khan Swades Movie Casting Secret: बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या गाजलेल्या सिनेमांपैकी एक म्हणून ‘स्वदेस’ ओळखला जातो. २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमातील शाहरुखच्या अभिनयाचे कौतुकही करण्यात आले होते. पण, विशेष म्हणजे ‘स्वदेस’ हा सिनेमा खरे तर आमिर खानसाठी तयार करण्यात आला होता. त्यानंतर सिनेमासाठी हृतिक रोशन आणि आर. माधवन यांच्या नावांचाही विचार करण्यात आला होता.

दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांना ‘लगान’नंतर पुन्हा आमिर खानबरोबर एकत्र काम करण्याचे असल्यामुळे ‘स्वदेस’साठी आमिर खानची निवड करण्यात आली होती; पण काही कारणांमुळे आमिर हा सिनेमा करू शकला नाही. स्वदेस या सिनेमाचे लेखक अमीन हाजी यांनी सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘स्वदेस’च्या कास्टिंगचा रंजक किस्सा सांगितला आहे. अमीन हाजी यांनी ‘स्वदेस’ सिनेमाचं मूळ नाव ‘देश’ होतं, असा खुलासा केला आहे.

आमिरला आवडल्या नाहीत ‘या’ गोष्टी

अमीन हाजी म्हणाले, “सुरुवातीपासूनच या सिनेमात आमिर खान मुख्य भूमिका साकारणार होता. ‘लगान’नंतर आशुतोष गोवारीकर यांनी पुढचा प्रोजेक्ट आमिरबरोबर करण्याचा विचार केला होता. आमिर खान प्रॉडक्शन्सच्या माध्यमातून याची निर्मिती करण्यात येणार होती; पण सिनेमाच्या कथेतील काही गोष्टी आमिरला आवडल्या नाहीत. मूळ गोष्ट जरी आवडली असली तरी बाकी इतर गोष्टींवर अजून काम करण्याची आमिरची इच्छा होती; पण पुरेसा वेळ मिळत नसल्याने त्याने या प्रोजेक्टमधून बाजूला होण्याचा निर्णय घेतला.”

पुढे ते म्हणाले, “आमिर खान ‘स्वदेस’मधून बाहेर पडल्यानंतर हृतिक रोशनला या सिनेमाची पटकथा ऐकवण्यात आली होती. तसेच अभिनेता आर. माधवननेही या भूमिकेसाठी ऑडिशनसुद्धा दिले होते. माधवनच्या ऑडिशनचे कौतुकही झाले होते; पण अखेर या प्रोजेक्टमध्ये शाहरुख खानची एन्ट्री झाली.”

शाहरुखचे वडील स्वातंत्र्यसैनिक असल्याने घेतला सिनेमा करण्याचा निर्णय

शाहरुख खानने स्वतःहून सिनेमामध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे अमीन हाजी यांनी सांगितले. ते म्हणाले, “शाहरुखला ‘लगान’ पाहायचा होता. त्याच्यासाठी फिल्मसिटीमधील ‘अॅडलॅब्स’मध्ये खास स्क्रीनिंग ठेवण्यात आले होते. यावेळी शाहरुखच्या शेजारी मी बसलो होतो. स्क्रीनिंग सुरू असताना शाहरुखने आशुतोष गोवारीकरांच्या पुढील प्रोजेक्टमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. शाहरुख म्हणालेला, “मी आशूच्या पुढच्या चित्रपटात असायला हवं. माझे वडील एक स्वातंत्र्यसैनिक होते. मला ‘देश’ करायला हवा. मी मोहन भार्गवची भूमिका साकारायला हवी.”

त्यानंतर शाहरुखने दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांना फोन करून स्वतःहून सिनेमामध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे पुढे शाहरुखनेच ‘स्वदेस’मध्ये मोहन भार्गवची भूमिका साकारली आणि ही भूमिका त्याच्या कारकिर्दीतील लक्षवेधी भूमिका ठरली.

दरम्यान, डिसेंबर २००४ मध्ये ‘स्वदेस’ चित्रपट प्रदर्शित झाला; परंतु त्यावेळी तो बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई करू शकला नाही. मात्र, नंतर या सिनेमाची चर्चा खूप रंगली आणि तो एक ‘कल्ट’ सिनेमा ठरला. शाहरुख खानच्या बॉलीवूड करिअरमधील लोकप्रिय अशा सिनेमांपैकी ‘स्वदेस’ एक ठरला.