Girija Oak Talks About Shahrukh Khan : शाहरुख खान बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. फक्त प्रेक्षकच नव्हे, तर अनेक कलाकारसुद्धा त्याचे चाहते आहेत आणि त्याच्याबरोबर काम केलेल्या कलाकारांकडे त्याच्याबरोबरच्या आठवणीही असतात. अनेकदा ते मुलाखतींमधून याबद्दल बोलत असतात. अशातच गिरिजा ओकनेही शाहरुख खानबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.

गिरिजाने २०२३ मध्ये आलेल्या ‘जवान’ चित्रपटात शाहरुख खानबरोबर काम केलं होतं. या चित्रपटाच्या निमित्तानं तिनं जवळपास दोन वर्षं अभिनेत्याबरोबर काम केल्याचं सिद्धार्थ कननशी संवाद साधताना सांगितलं आहे. यावेळी तिनं, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं ड्रग्ज प्रकरण सुरू होतं तेव्हा अभिनेता कठीण परिस्थितीतून जात होता, असं म्हटलं आहे.

मुलाखतीत शाहरुख खानबद्दल गिरिजा म्हणाली, “माझ्या त्याच्याबरोबरच्या खूप आठवणी आहेत. आम्ही जवळजवळ दोन वर्षं एकत्र शूट केलं. त्यादरम्यान मी त्याला अनेकदा भेटले.” गिरिजानं यावेळी ती ‘जवानच्या सेटवर तिच्या सहअभिनेत्रीसह कामाच्या व्यापामुळे मुलाला भेटता येत नाही, अशी चर्चा करत होती आणि शाहरुखनं ते ऐकल्यानंतर तोही त्याच्या मुलांबद्दल बोलू लागला, असं सांगितलं आहे.

गिरिजा म्हणाली, “शाहरुख खाननं आमचं बोलणं ऐकलं आणि तो म्हणाला की, मलासुद्धा माझ्या मुलांना भेटता येत नाहीये. जेव्हा मी सकाळचा घरी जातो तेव्हा तो झोपलेला असतो आणि जेव्हा मी कामासाठी बाहेर जायला तयार झालेलो असतो. तेव्हा तो शाळेत गेलेला असतो. मला सुहानालासुद्धा भेटता येत नाही. आर्यन त्याच्या कामात व्यग्र आहे. त्यामुळे माझ्या मुलांना भेटता येत नसल्यानं वाईट वाटतं. म्हणून मी सुहानाला सेटवर भेटायला बोलावलं.” गिरिजानं पुढे शाहरुख खान त्यांच्याशी इतक्या घरेलू गोष्टी शेअर करेल, असं तिला वाटलं नव्हतं, असं सांगितलं.

आर्यन खानबद्दल गिरिजा म्हणाली, “मी आर्यन केस सुरू झाली तेव्हा शाहरुख खानबरोबर शूटिंग करत होते. त्याच्याआधी लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारादरम्यानसुद्धा कॉन्ट्रोवर्सी झालेली की दुआवरून काहीतरी; पण तेव्हासुद्धा मी एकदाही त्याला त्यामुळे अस्वस्थ झालेलं पाहिलेलं नाही किंवा रागावलेला पाहिलं नाही. त्यावेळी तो त्याच्या आयुष्यातील कठीण प्रसंगातून जात होता; पण तरी त्यानं त्याचं काम अचूक केलं आणि दोन वर्षं हा मोठा कालावधी आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला एवढ्या वेळात तुम्ही ओळखू लागता. मी त्याला या सगळ्या प्रसंगातून जाताना पाहिलं आहे.”

आर्यन खान केसबद्दल गिरिजा ओकची प्रतिक्रिया

आर्यन खानच्या केसबद्दल गिरिजा पुढे म्हणाली, “जेव्हा ३-४ महिने ती केस सुरू होती तेव्हा शाहरुखनं एकाही सार्वजनिक इव्हेंटला हजेरी लावली नाही आणि तेव्हा तो ‘जवान’साठी शूटिंगही करत नव्हता. त्यामुळे त्यादरम्यान मी त्याला पाहिलं नाही. तेव्हा कोणीही त्याला संपर्क करू शकत नव्हतं. आम्ही त्याला तेव्हाच भेटलो जेव्हा ‘जवान’चं शूटिंग पुन्हा सुरू झालं आणि तोपर्यंत ती केसही संपली होती वाटतं आणि तेव्हा तो पूर्वीसारखाच होता.”