Shah Rukh Khan Talks About Zeenat Aman : शाहरुख खान बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. त्यानं आतापर्यंत अनेक चित्रपटांत विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे फरहान अख्तर दिग्दर्शित ‘डॉन २’ हा चित्रपट. यामध्ये त्यानं मुख्य भूमिका साकारलेली. अमिताभ बच्चन व झीनत अमान यांच्या ‘डॉन’ चित्रपटाचा हा रिमेक आहे.

१९७८ मध्ये आलेल्या चंद्रा बारोट दिग्दर्शित ‘डॉन’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी मुख्य नायकाची तर झीनत अमान यांनी मुख्य नायिकेची भूमिका साकारलेली. यामध्ये त्यांच्या पात्राचं नाव रूमा होतं. शाहरुख खाननं चित्रपटाच्या सीक्वलमध्ये काम केल्यानंतर त्यानं यामध्ये ‘डॉन’चं पात्र साकारलेलं. परंतु, त्याला झीनत अमान यांचं रूमा हे पात्र साकारायचं होतं, असं त्यानं स्वत: सांगितलेलं.

येत्या ५ एप्रिल रोजी ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड २०२६’ हा सोहळा पार पडणार आहे. यानिमित्तानं आपण ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड शो’मधील कलाकारांचे जुने किस्से व आठवणींना उजळा देत आहोत. २०१७ साली पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यादरम्यान शाहरुख खाननं त्याला ‘डॉन २’मध्ये अमिताभ बच्चन यांचं पात्र साकारायचं नव्हतं तर झीनत अमान यांचं रूमा हे पात्र साकारायचं होतं असं म्हटलेलं. अभिनेता नेमकं काय म्हणालेला आणि हा किस्सा नेमका काय आहे सविस्तर जाणून घेऊयात…

Award Banner

शाहरुख खान काय म्हणालेला?

पुरस्कार सोहळ्यादरम्यान शाहरुख खान झीनत अमान यांच्याबरोबर संवाद साधत असताना अभिनेत्रीला उत्सुक होत म्हणाला, “जेव्हा मी फरहान अख्तरबरोबर ‘डॉन’ चित्रपटासाठी काम करत होतो आणि त्यानं जेव्हा मला पात्राबद्दल सांगितलं, तेव्हा मी तुमचा इतका मोठा चाहता आहे की मी त्याला सांगितलं की मला डॉन बनायचं नाहीये, मला रूमाचं पात्र साकारायचं आहे”

९०च्या काळात हिट ठरलेल्या अमिताभ बच्चन यांच्या ‘डॉन’ या चित्रपटाचा सीक्वल २००६ मध्ये आला होता, ज्यामध्ये शाहरुखनं डॉनची भूमिका साकारलेली, तर प्रियांका चोप्रानं रूमाचं पात्र साकारलेलं, जे पहिल्या भागात अभिनेत्री झीनत अमान यांनी साकारलेलं.

पुरस्कार सोहळ्यात झीनत अमान यांचं कौतुक करत शाहरुख पुढे म्हणालेला, “तुम्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशी ओळख कमावली, जी आजही मिस इंडिया, मिस वर्ल्डसाठी प्रेरणादायी आहे. अनेकांचं आजही झीनत अमानसारखं बनण्याचं स्वप्न आहे. तुम्ही ठरवून बोल्ड अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या का, हे कसं घडलं?” शाहरुख खाननं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना झीनत अमान यांनी हे आपसूकच घडलं असं म्हटलेलं.

अभिनेत्री म्हणालेल्या, “हे ठरवलेलं नव्हतं, असं काहीच नियोजन केलं नव्हतं, माझं सुदैव आहे की हे घडलं.” पुढे त्यांनी तरुणांना काय सल्ला द्याल असं विचारल्यानंतर “स्वत:वर आणि स्वत:च्या कामावर विश्वास ठेवा असं म्हटलेलं.”