मिलिंद सोमण मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांच्या अभिनयासह त्यांच्या फिटनेसचही अनेक जण कौतुक करत असतात. अभिनेते मिलिंद सोमण त्यांच्या खासगी व व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. अशातच आता त्यांच्या एक्स गर्लफ्रेंडने अभिनेत्री शहाना गोस्वामीने त्यांच्याबरोबरच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे. २१ वर्षांनी लहान असलेल्या त्यांच्या गर्लफ्रेंडने यावेळी त्यांच्याबरोबरच्या ब्रेकअपमागचं कारणही सांगितलं आहे.

शहाना गोस्वामीने मिलिंद सोमण यांच्याबरोबरच्या त्यांच्या नात्याबद्दल नुकताच खुलासा केला. दोघांच्या वयात तब्बल २१ वर्षांचं अंतर होतं. शहानाने सांगितलं की, त्यांचं नातं साधारण दीड ते दोन वर्षं टिकलं होतं. यावेळी तिने तिला नेहमी तिच्याबद्दल असुरक्षित वाटायचं आणि ती स्वत:वर प्रेम करत नव्हती त्यामुळे तिला खूप त्रास झाला असंही म्हटलं आहे.

…म्हणून मिलिंद सोमणबरोबर केलं ब्रेकअप

शहाना गोस्वामी म्हणाली, “आम्ही साधारण दीड ते दोन वर्षं एकत्र होतो. लहानपणापासूनच माझ्या आयुष्यात अनेक लोक आले. मात्र, प्रत्येक रिलेशनशिपनंतर मला खूप त्रास झाला, मला वेदना सहन कराव्या लागल्या. त्या काळात मला एक गोष्ट जाणवली की, जोपर्यंत मला स्वतःवर प्रेम करायला शिकता येणार नाही, तोपर्यंत कोणत्याही नात्यातून मला प्रेम मिळणार नाही”.

अभिनेत्री पुढे म्हणाली, “समोरची व्यक्ती तिच्या दृष्टीने माझ्यासाठी कितीही काही करत असली, तरी ते प्रेम मी स्वीकारू शकणार नाही. मला सतत असं वाटत राहील की, माझं परीक्षण केलं जातंय, मी कमी पडत आहे आणि मला स्वतःबद्दल आत्मविश्वास वाटत नसल्यामुळे मलाच त्रास होईल. त्याच काळात मला ही जाणीव झाली आणि मी माझ्या तेव्हाच्या प्रियकराबरोबर ब्रेकअप केलं. मी त्याला सांगितलं की, मला जाणवतंय की ही माझीच समस्या आहे आणि जोपर्यंत मला हे समजून घेता येत नाही, तोपर्यंत मी कोणत्याच नात्यात आनंदी नसेन. त्यामुळे मला स्वतःबरोबर वेळ घालवायचा आहे आणि स्वतःवर प्रेम करायचं आहे, त्यासाठी स्वतःवर काम करायचं आहे.”

दरम्यान, प्रियांका भट्टशी संवाद साधताना शहानाने मिलिंद सोमण यांच्याबरोबरच्या ब्रेकअपबद्दल सांगितलं आहे. दोघे २०१३मध्ये वेगळे झाले होते. पुढे मिलिंद यांनी २०१८मध्ये अलिबागमध्ये पारंपरिक पद्धतीने लग्न केलं.