Shahid Kapoor Video : मुंबईत ५ एप्रिल रोजी होणाऱ्या ‘चेतक स्क्रीन अवॉर्डस २०२६’च्या निमित्ताने या सोहळ्यातील काही गाजलेल्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. अशीच एक मजेशीर आठवण आहे २०१० च्या स्क्रीन अवॉर्डसमधली जेव्हा अभिनेता शाहिद कपूरने आपल्या विनोदी शैलीने सर्वांचे मनोरंजन केले होते. २००९ मधील ‘३ इडियट्स’मधील ‘चतुर’ या पात्राची नक्कल करीत शाहिदने केलेले सूत्रसंचालन आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

२००९ मधील सुपरहिट ‘३ इडियट्स’ चित्रपटातील ‘चतुर’च्या स्टाईलमध्ये शाहिदने एक भाषण सादर केले होते आणि ते पाहून प्रेक्षक व उपस्थित हसून लोटपोट झाले होते.

त्यावेळी सूत्रसंचालन करताना शाहिद म्हणाला होता, “चित्रपटसृष्टीसाठी २००९ ची सुरुवात जरी थोडी कठीण झाली असली तरी शेवटी ‘३ इडियट्स’नं संपूर्ण इंडस्ट्रीला सावरलं आणि या चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक आज आपल्यातच बसलेले आहेत.” त्यानंतर त्यानं ‘३ इडियट्स’चे निर्माता विधू विनोद चोप्रा आणि दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांना अभिवादन केलं.

Award Banner

त्यानंतर शाहिदने ‘चतुर’ची भूमिका साकारणाऱ्या ओमी वैद्यला प्रेक्षकांमध्ये शोधायला सुरुवात केली. मजेशीर अंदाजात तो म्हणालेला, “चतुर, कुठे आहेस तू? चल, तुझं ‘टोफू’ दाखव!” आणि सगळेच हसून लोटपोट झाले. पुढे शाहिद म्हणाला, “आम्ही इथे ‘३ इडियट्स’च्या स्टाईलमध्ये एक भाषण तयार केलं आहे. आणि मला आशा आहे की, त्या खट्याळ ‘रांचो’ने (आमिर खान) त्यात काही बदल केले नसतील. एक मिनीट, मी जरा तपासून पाहतो.”

त्यानंतर आमिर खानच्या आवाजात एक मजेशीर व्हॉइस नोट ऐकवण्यात आली, ज्यात तो म्हणला होता, “आता बघा, मजा येईल. मी भाषणातील ‘चांगल्या’ शब्दांच्या जागी ‘तुच्छ’ शब्द टाकला आहे. एंजॉय करा.”

त्यानंतर शाहिदने आपले भाषण सुरू केले. “आदरणीय मान्यवर, प्रेक्षक आणि इथे उपस्थित सगळे लोक… मी तुम्हाला आनंदाने सांगू इच्छितो की, तुम्ही सगळे खूप ‘तुच्छ’ दिसत आहात.” हे ऐकून प्रेक्षकांमध्ये बसलेल्या जया बच्चन यांनाही हसू आवरले नाही.

शाहिद पुढे म्हणाला, “आणि मी इथे तुमचा सगळ्यात ‘तुच्छ’ होस्ट आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की, स्क्रीन अवॉर्डस हे सगळ्यात ‘तुच्छ’ पुरस्कार आहेत. आणि या ‘तुच्छ’ पुरस्कारांद्वारे गेल्या वर्षातील पाच सगळ्यात ‘तुच्छ’ चित्रपटांना सन्मानित केलं जात आहे. टाळ्या वाजवा.”

ओमी वैद्यने साकारलेल्या ‘चतुर’ या पात्राची शैली, अडखळत बोलण्याची पद्धत आणि त्याचे खास हावभाव हे सगळे शाहिद कपूरने इतके अचूक सादर केले की, तो पुरस्कार सोहळ्यातला सर्वांत मजेशीर आणि लक्षात राहणारा क्षण ठरला होता.