Shahid Kapoor : बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर हा त्याच्या आगामी ‘कॉकटेल २’ चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. या चित्रपटामध्ये तो अभिनेत्री क्रिती सेनॉन व रश्मिका मंदाना यांच्यासह झळकणार आहे. शाहिद कपूर हा बॉलीवूडमध्ये वर्षानुवर्षे काम करीत असून, त्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्याचा मोठा चाहता वर्ग आहे; मात्र मागील वर्षामध्ये शाहिद कपूरचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट होऊ शकले नाहीत. चित्रपट फ्लॉप होत असल्यामुळे शाहिदने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचे सांगितले.
अनुभवातून शिकला महत्त्वाची गोष्ट
काही दिवसांपासून अभिनेता शाहिद कपूर याचे काही चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. त्याचे ‘देवा’ व ‘ओ रोमिओ’ या दोन्ही चित्रपटांची प्रदर्शनाआधी बरीच चर्चा रंगली होती; मात्र बॉक्स ऑफिसवर त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. या अनुभवातून आपण एक महत्त्वाची गोष्ट शिकलो असून, आता चित्रपटांची निवड करताना वेगळा विचार करीत असल्याचे शाहिदने सांगितले आहे.
‘द हॉलीवूड रिपोर्टर इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत शाहिद कपूर म्हणाला की, चित्रपटांना अपेक्षित यश न मिळाल्यामुळे स्क्रिप्ट निवडण्याची पद्धत बदलली आहे. आता चित्रपटाची कथा किंवा नॅरेशन एकट्याने ऐकत नाही, तर माझ्या टीममधील काही लोकांनाही बरोबर घेऊन जातो, असा खुलासा शाहिद कपूरने केला आहे.
शाहिद कपूरने काय घेतला निर्णय?
पुढे शाहिद कपूर म्हणाला, “मी माझ्या टीमला आता एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली आहे. कदाचित चित्रपटाची स्क्रिप्ट निवडण्याचा निर्णय मी एकट्याने घेऊ नये. कॅमेऱ्यासमोर काय करायचे हे मला चांगले माहीत आहे; पण कोणता चित्रपट निवडायचा याबाबत मी नेहमीच योग्य असेन, असे नाही. त्यामुळे आता मी नॅरेशन एकट्याने ऐकण्याऐवजी खोलीत आणखी तीन-चार जण असावेत, यावर भर देतो. त्यामुळे एखाद्या कथेचा विचार फक्त माझ्या दृष्टिकोनातून होणार नाही,” असे स्पष्ट मत अभिनेता शाहिद कपूरने मांडले आहे.
शूटिंगमध्ये दिग्दर्शकाचे समाधान महत्त्वाचे – शाहिद
स्वतःच्याच अलीकडील काही चित्रपटांच्या अपयशाबद्दल बोलताना शाहिद कपूर म्हणाला की, अभिनेता म्हणून आपण जे काम करतो, त्यावरही आपले पूर्ण नियंत्रण नसते. एखादा सीन कसा दिसेल, फ्रेम कशी असेल हे दिग्दर्शक ठरवतो आणि त्यालाही त्या कामाबद्दल समाधान वाटणे महत्त्वाचे असते, असे मत अभिनेता शाहिद कपूरने व्यक्त केले आहे.
‘कॉकटेल २’ कधी होणार रिलीज?
अभिनेता शाहिद कपूरने २०२५ साली ‘देवा’ चित्रपटामध्ये काम केले होते. मात्र, हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. ‘देवा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुमार कामगिरी करणारा ठरला. त्यानंतर २०२६ च्या सुरुवातीला शाहिद कपूरचा ‘ओ रोमिओ’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली होती. तरुण वर्गामध्ये या चित्रपटाची उत्सुकता दिसून आली होती; मात्र प्रत्यक्षात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई करू शकला नाही. आता लवकरच शाहिद कपूरचा ‘कॉकटेल २’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दिग्दर्शक होमी अदजानिया यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘कॉकटेल’ चित्रपटाने प्रेम आणि मैत्रीची नवी व्याख्या सांगितली होती. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा ‘कॉकटेल २’ सीक्वेल असणार आहे. १९ जून रोजी ‘कॉकटेल २’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
