बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर नुकताच 'जब वी मेट'च्या सीक्वलमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आला होता. आता शाहिद त्याच्या 'हैदर' या सुपरहिट चित्रपटामुळे पुन्हा प्रकाशझोतात आला आहे. या चित्रपटातील त्याच्या व्यक्तिरेखेचे खूप कौतुक झाले आणि या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला होता. विशाल भारद्वाज यांनी या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन केलं होतं अन शेक्सपिअरच्या 'हॅम्लेट'वर ही कथा बेतलेली होती. या चित्रपटासाठी कोणतंही मानधन घेतलं नसल्याने शाहिदने नुकतंच एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं आहे. 'फिल्म कंपेनियन'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शाहिदने यामागील कारणही सांगितलं आहे. आणखी वाचा : सिल्क स्मिताने खाल्लेल्या अर्ध्या सफरचंदाचा झालेला लिलाव; 'एवढ्या' किंमतीला विकलं गेलेलं फळ याबद्दल बोलताना शाहिद म्हणाला, "खरं सांगायचं झालं तर त्यावेळी त्या चित्रपटासाठी माझं मानधन निर्मात्यांना परवडलं नसतं अन् यामुळे चित्रपटाचं बजेट खूप वाढलं असतं. शिवाय या चित्रपटाचा विषयही बराच वेगळा होता, म्हणूनच मी यासाठी मानधन न घेता या चित्रपटात मोफत काम करायचं ठरवलं." शाहिद कपूर नुकताच 'ब्लडी डॅडी' चित्रपटात दिसला. आता तो 'कोई शक' या थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मल्याळम चित्रपट निर्माते रोशन एंड्रयूज करणार आहेत. अद्याप चित्रपटाचे शूटिंग सुरू झालेले नाही. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्याची शक्यता आहे.