अभिनेता शाहिद कपूर आज बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये गणला जातो. दमदार अभिनय आणि उत्तम नृत्य कौशल्याच्या जोरावर त्याने जगभरात प्रसिद्धी मिळवली आहे. पण शाहिद कपूरची आई निलिमा अजीम यांनीही बॉलिवूडमध्ये बरंच नाव कमावलं आहे. त्यांनी आतापर्यंत ‘सलीम लंगड़े पे मत रो’, ‘सड़क’, ‘सूर्यवंशम’, ‘इश्क विश्क’ आणि ‘ब्लॅकमेल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्या एक उत्तम कथ्थक डान्सर आहेत. पण आयुष्यात सर्वकाही उत्तम असतानाही निलिमा अजीम यांचं खासगी आयुष्य मात्र कायमच चढ-उतार आले. विशेषतः त्यांचं वैवाहिक आयुष्य खूपच चर्चेत राहिलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निलिमा अजीम यांनी पंकज कपूर यांच्याशी पहिलं लग्न केलं होतं. पंकज आणि निलिमा यांची पहिली भेट नाटकांच्या तालमींच्या वेळी झाली होती. एकीकडे पंकज कपूर एक उत्तम अभिनेते होते तर निलिमा या नृत्यकलेत स्वतःचं करिअर करू इच्छित होत्या. निलिमा एक उत्तम कथ्थक नर्तिका होत्या. दोघांची चांगली मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. यानंतर लगेचच दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी १९७५ मध्ये लग्न केलं आणि त्यावेळी पंकज कपूर २१ वर्षांचे होते आणि नीलिमा फक्त १६ वर्षांच्या होत्या. लग्नानंतर १९८१ मध्ये निलिमा यांनी मुलगा शाहिद कपूरला जन्म दिला. यानंतर दोघांमध्ये दुरावा आला. दोघांमधील वाद इतके वाढले की काही काळानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पंकज कपूर यांनी १९८४ मध्ये पत्नी निलिमापासून घटस्फोट घेतला.

आणखी वाचा- शोएब मलिकशी लग्नाआधी सानिया मिर्झा शाहिद कपूरला करत होती डेट, पण ब्रेकअप झालं अन्…

पंकज कपूर यांच्यापासून वेगळं झाल्यानंतर निलिमा टीव्ही अभिनेता आणि मिमिक्री आर्टिस्ट राजेश खट्टर यांच्या प्रेमात पडल्या. दोघांनी १९९० मध्ये लग्न केलं. ईशान खट्टर हा दोघांचा मुलगा आहे. पंकज कपूर यांच्याबरोबर लग्न तुटल्यानंतर निलिमा यांचं दुसरं लग्नही फार काळ टिकलं नाही आणि राजेश खट्टर यांच्यापासून त्या २००१ साली विभक्त झाल्या. राजेश खट्टर यांच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर एका मुलाखतीत निलिमा म्हणाल्या होत्या, “काही गोष्टी घडल्या नसत्या तर कदाचित माझं दुसरं लग्न टिकलं असतं. पण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं कदाचित चुकीचं होतं आणि अशक्यही. मला वाटतं, यावर नियंत्रण असतं तर मी हे लग्न वाचवू शकले असते पण ते संपलं आहे.”

आधी पंकज कपूर आणि नंतर राजेश खट्टर यांच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर निलिमा यांनी २००४ मध्ये रझा अली खान यांच्याशी लग्न केलं. पण अवघ्या पाच वर्षांत त्यांचं नातं संपुष्टात आलं. नीलिमा आणि रझा अली खान यांनी २००९ मध्ये घटस्फोट घेतला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahid kapoor mother neelima azeem love life three unsuccessful marriage and divorce mrj
First published on: 03-12-2022 at 15:00 IST