The kerala Story 2 And O’Romeo Box Office Collection: सध्या थिएटरमध्ये एकापेक्षा एक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. गेल्या काही दिवसांत अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यामध्ये शाहिद कपूरचा ओ रोमिओ हा चित्रपट आहे.

‘द केरला स्टोरी २’ व ‘ओ रोमिओ’चे कलेक्शन किती?

ओ रोमिओ हा सिनेमा १३ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित झाला होता. विशाल भारद्वाज दिग्दर्शित या चित्रपटाने आतापर्यंत चांगली कमाई केली. मात्र, शाहिदच्या याआधीचे रंगून, हैदर या चित्रपटांना जसा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला, तसा प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला नसल्याचे पाहायला मिळाले. मात्र, ओ रोमिओ चित्रपटाच्या गोष्टीसह गाण्यांनीदेखील लक्ष वेधले. या सिनेमात शाहिद कपूरबरोबर तृप्ती डिमरी, विक्रांत मॅसी, दिशा पाटणी, नाना पाटेकर असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसले.

आता ‘ओ रोमिओ’ला ‘द केरला स्टोरी २’बरोबर थिएटरमध्ये स्पर्धा करावी लागत आहे. आता तिसऱ्या आठवड्यात म्हणजेच १७ व्या दिवशी या चित्रपटाने किती कमाई केली आहे, तसेच ‘द केरला स्टोरी २’च्या प्रदर्शित होण्याचा ‘ओ रोमिओ’च्या कमाईवर काय परिणाम झाला, हे जाणून घेऊ…

‘ओ रोमिओ’ने पहिल्या आठवड्यात ४७.१ कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने १४.४५ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर १५ व्या दिवशी चित्रपटाने १.१५ कोटीची कमाई केली. तर, १६ व्या दिवशी चित्रपटाने १.३ कोटीची कमाई केली. ‘सॅल्कनिक’नुसार चित्रपटाने १७ व्या दिवशी म्हणजेच रविवारी १.२० कोटीची कमाई केली. या कमाईसह चित्रपटाने १७ दिवसांत ६५.२० कोटींची कमाई केली आहे. तसेच, चित्रपटाने जगभरात १०१ कोटींची कमाई केली आहे.

द केरला स्टोरी २: गोज बियॉन्ड हा सिनेमा २७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शित होण्यापूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. आता सिनेमाने रविवारी म्हणजेच तिसऱ्या दिवशी पाच कोटींची कमाई केली. त्यासह या चित्रपटाने १०.४० कोटींची कमाई केली. पहिल्याच आठवड्यात १० कोटींची कमाई करत चित्रपटाने काही चित्रपटांचे रेकॉर्डही मोडले आहेत.

त्यामध्ये ४.२ कोटींची कमाई करणारा मृणाल ठाकूरचा दोन दीवाने शहर में हा सिनेमा आहे. तसेच, तापसी पन्नूची महत्त्वाची भूमिका असणारा अस्सी हा सिनेमादेखील आहे. या सिनेमानेसुद्धा पहिल्या आठवड्याच ४.२ कोटींची कमाई केली होती.

आता कामाख्या नारायण सिंह दिग्दर्शित हा सिनेमा आगामी काळात किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.