Shahid Kapoor : बॉलीवूडचा ‘चॉकलेट हिरो’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहिद कपूरने २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण केलं होतं. शाहिद कपूर आजच्या घडीला स्टार असला तरी, एक काळ असा होता…जेव्हा त्याने अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केलं होतं. यादरम्यानचा अनुभव शाहिदने काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितला आहे.
ऐश्वर्या राय, अनिल कपूर आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘ताल’ चित्रपट १९९९ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ‘ताल’ सिनेमातील सगळीच गाणी सुपरहिट ठरली. आज इतक्या वर्षांनीही ‘ताल’मधील गाणी सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. यापैकीच एक गाणं म्हणजे “कहीं आग लगे लग जावे…” हे गाणं ए आर रेहमान यांनी संगीतबद्ध केलं असून या गाण्यावर ऐश्वर्या रायने जबरदस्त सादरीकरण केलं आहे. पण, तुम्हाला माहितीये का या गाण्यात ऐश्वर्याबरोबर बॅकग्राउंडला शाहिदने देखील डान्स केला आहे.
या गाण्याच्या शूटिंगचा अनुभव शाहिदने ‘रेडिओ नशा’शी संवाद साधताना सांगितला होता. तो म्हणाला, “हे कोणालाच माहिती नाहीये…पण त्यादिवशी शूटिंगला जात असताना माझा अपघात झाला होता. मला अजूनही खूप चांगलं आठवतंय…मी बाईकवरून सेटवर जात असताना रस्त्यात पडलो. त्यामुळे जेव्हा मी सेटवर पोहोचलो तेव्हा प्रचंड घाबरलो होतो…माझ्या डोक्यात सतत हेच विचार सुरू होते की, ‘अरे हे आपल्याबरोबर काय झालं?’ आणि त्याच गोंधळलेल्या अवस्थेत मी शूटिंगला गेलो.”
“खरंतर एवढ्या मोठ्या सिनेमात तेव्हा काम करायला मिळणं ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती, नेमका त्याच दिवशी अपघात झाला. त्यामुळे तो माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस म्हणून कायम लक्षात राहील. पण ऐश्वर्याबरोबर डान्स करताना… जेव्हा आमचे शॉट चांगले झाले, आमचं शूट पूर्ण झालं, तेव्हा मी खूप आनंदी झालो.” असं शाहिदने सांगितलं.
अपघात झाला, मी पडलो या सगळ्या घटना घडूनही नंतर बॅकग्राउंड डान्सर म्हणून का होईना… ऐश्वर्या रायबरोबर स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली यासाठी शाहीदने कृतज्ञता देखील व्यक्त केली.
‘ताल’ चित्रपटाच्याआधी शाहिदने १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल तो पागल है’ या चित्रपटात सुद्धा बॅकग्राउंड डान्सरची भूमिका साकारली होती. दरम्यान, शाहिदच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर लवकरच तो ‘कॉकटेल २’मध्ये झळकणार आहे. हा चित्रपट १९ जून २०२६ रोजी प्रदर्शित होईल. यामध्ये शाहिदसह रश्मिका मंदाना आणि क्रिती सेनॉन यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
