बॉलिवूडमध्ये बऱ्याच अभिनेत्रींबरोबर नाव जोडलं गेल्यामुळे अभिनेता शाहिद कपूर हा चांगलाच चर्चेत होता, पण २०१५ मध्ये त्याने मीरा राजपूतशी लग्नगाठ बांधली. मीराचा चित्रपटक्षेत्राशी काहीही संबंध नाही, पण शाहिदशी लग्न केल्यानंतर तीसुद्धा लाईमलाइटमध्ये आली. ८ वर्षांच्या या सुखी संसारात या सेलिब्रिटी जोडप्याला दोन मुलंदेखील झाली. २०१५ मध्ये जेव्हा मीरा लग्न करून प्रथम शाहिदच्या घरी आली तेव्हा आपल्या घराची अवस्था कशी होती याबद्दल शाहिदने नुकतंच एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. शाहिद म्हणाला, "मीरा जेव्हा लग्न करून प्रथम माझ्या घरी आली तेव्हा माझ्या घरात फक्त दोन चमचे आणि एक ताट एवढ्याच वस्तू होत्या. त्यावेळी मीराने माझ्याकडे याबद्दल तक्रार केली. पण तेव्हा मी घरात एकटाच राहायचो त्यामुळे इतर वस्तूंची कधीच गरज भासली नव्हती." आणखी वाचा : नसीरुद्दीन शाह यांची 'ISRO'च्या प्रमुखांवर टीका; म्हणाले, "आपण पुन्हा अंधश्रद्धेकडे…" पुढे शाहिद म्हणाला, "जेव्हा मीराने विचारलं की आपल्याकडे एकही डायनिंग सेट नाही, जेव्हा आपल्याकडे पाहुणे येतील तेव्हा त्यांना कशामध्ये खायला द्यायचं. यावर मी तिला उत्तर दिलं की आपण बाहेरून काहीतरी ऑर्डर करू. यानंतर मात्र मी आणि मीरा आम्ही दोघांनी घराच्या इंटेरियरवर काम केलं आणि तिला जसं हवं होतं अगदी तसंच आम्ही आमचं घर सजवलं." येत्या ८ जुलैला शाहिद कपूर आणि मीरा कपूर यांच्या लग्नाला ८ वर्षं पूरण होणार आहेत. शाहिद कपूरने नुकतंच 'फर्जी' या वेबसीरिजमधून ओटीटी विश्वात पदार्पण केलं. आता लवकरच त्याचा 'ब्लडी डॅडी' हा चित्रपट जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. याबरोबरच शाहिद कपूर क्रीती सनॉंनबरोबर आणखी एका चित्रपटात झळकणार आहे.