O’Romeo Box Office Collection Day 1: शाहिद कपूरचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘ओ’ रोमियो’ शुक्रवारी (१३ फेब्रुवारी रोजी) सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाची मागील अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा होती.विशाल भारद्वाज व शाहिद कपूर ‘हैदर’ व ‘कमिने’नंतर ओ’ रोमियोद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ओ रोमियो या चित्रपटाने ओपनिंग कलेक्शन किती केले, ते जाणून घेऊयात.

ओ’ रोमियो हा हुसेन झैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकातील एका प्रकरणावर आधारित चित्रपट आहे. यात शाहिद कपूरने ‘हुसैन उस्तरा’ नावाच्या एका खतरनाक गँगस्टरची भूमिका साकारली आहे, जो आपल्या वस्तऱ्याने शत्रूंना मारतो. तो आयबी ऑफिसर खान (नाना पाटेकर) साठी काम करत असतो. हा चित्रपट तब्बल २ तास ५८ मिनिटांचा (जवळपास ३ तास) असून तो शाहिद कपूरच्या करिअरमधील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे.

ओ रोमियोचे ओपनिंग कलेक्शन

सॅकनिल्कच्या मते, ओ’रोमियोची पहिल्या दिवसाची कमाई चांगली झाली. ओ रोमियोने पहिल्या दिवशी ८.२५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. १२५ कोटी रुपयांचे बजेट असलेल्या या चित्रपटाला बजेटची रक्कम वसूल करायला बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करावी लागणार आहे.

साजिद नाडियाडवाला निर्मित ओ’रोमियोमध्ये तृप्ती डिमरी, नाना पाटेकर, अविनाश तिवारी आणि विक्रांत मॅसी या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

शाहिद कपूरचा कमिने २२ कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. या चित्रपटाने २००९ साली ७०.४० कोटी रुपये कमावले होते. तर हैदर ४५ कोटींच्या बजेटमध्ये तयार केला होता, या चित्रपटाने ७९.२० कोटी कमावले होते. रंगून चित्रपटाचे बजेट ६० कोटी होते, पण तो फ्लॉप ठरला होता. कारण त्याने फक्त ३९.८० कोटींचे कलेक्शन केले होते. शाहिद कपूरच्या अलिकडच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास त्याच्या देवा चित्रपटाने ५.५ कोटींची ओपनिंग केली होती. ५० कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटाने ५५.८ कोटींचे कलेक्शन केले होते. तर शाहिदीच्या तेरी बातों में ऐसा उलझा जियाचे बजेट ७५ कोटी होते. त्याने जगभरात १२८.५० कोटी कमावले होते.

शाहिदचा सर्वाधिक ओपनिंग करणारा व सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

कबीर सिंग हा शाहिदचा आतापर्यंतचा सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट राहिला आहे, त्याने पहिल्या दिवशी २०.२१ कोटी रुपये आणि भारतात पहिल्या वीकेंडला ७० कोटी रुपये कमावले होते. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या चित्रपटाने जगभरात ३७७ कोटी रुपये कमावले होते. पण करोनानंतर प्रदर्शित झालेल्या शाहिद कपूरच्या जर्सीला बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करता आली नव्हती. दरम्यान, पद्मावत हा शाहिद कपूरचा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. या चित्रपटाने जगभरात ५८८ कोटी रुपयांची कमाई केली.

आता सर्वांचे लक्ष वीकेंडच्या आकड्यांवर लागले आहे. शाहिदचा हा चित्रपट ओपनिंग डे पेक्षा जास्त कमाई करतो की नाही ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. कारण विशाल भारद्वाज यांनी हैदरनंतर एकही थिएटर हिट चित्रपट दिलेला नाही, ज्यामुळे ओ रोमियो हा चित्रपट त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा आहे.