Neelima Azeem on 3 failed marriages: शाहिद कपूर व ईशान खट्टरची आई नीलिमा अझीम अनेकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलेपणाने बोलतात. नुकतीच त्यांनी ‘झूम टीव्ही’ला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी सांगतिल्या. तसेच, त्यांची लग्ने टिकली नाहीत म्हणून त्यांच्यावर जी टीका टिप्पणी केली जाते, त्याबद्दलही त्यांनी वक्तव्य केले.

नीलिमा अझीम यांची तीन लग्ने झाली आहेत. त्यांनी पहिल्यांदा पंकज कपूर यांच्याबरोबर लग्नगाठ बांधली. त्यानंतर त्यांनी राजेश खट्टर यांच्याबरोबर लग्नगाठ बांधली. राजेश खट्टर यांच्याबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर नीलिमा अझीम यांनी उस्ताद रझा अली खान यांच्याशी लग्नगाठ बांधली. त्यांचा २००९ ला घटस्फोट झाला. नीलिमा अझीम परिस्थिती स्वीकारून, त्यांच्या आयुष्यात पुढे गेल्या आहेत. मात्र, सोशल मीडियावर अनेकदा त्यांच्या खासगी आयुष्यावरून त्यांना ट्रोल केले जाते.

“दारू पिऊन…”

सोशल मीडियावर किती नकारात्मक बोलले जाते, याबद्दल नीलिमा अझीम म्हणाल्या, “एके दिवशी कोणीतरी कमेंट केली की, दारू पिऊन काय परिस्थिती झाली आहे. मी दारू पीत नाही. कोणतंही सत्य माहीत नसताना सोशल मीडियावर विधानं केली जातात.”

लग्न टिकले नाही, यासाठी त्यांना जे जबाबदार ठरवले जाते, त्याबद्दल नीलिमा म्हणाल्या, “मी खूप साध्या पुरुषांशी लग्न केले, ज्यांच्याकडे पैसे नव्हते; पण त्यांच्याकडे प्रतिभा होती आणि ते चांगले होते, असा मी त्या त्या वेळी विचार केला. मी कधीच संपत्ती किंवा श्रीमंती पाहून लग्न केलं नाही. ते माझ्यासाठी पैसे खर्च करतील, माझ्या बिझनेसमध्ये गुंतवणूक करतील, असा विचार करून मी रिलेशनशिपमध्ये गेले नाही. मला जे काही येत होतं. ते मी केलं. मी थिएटर केलं, मी टीव्हीमध्ये काम केलं. मी सूत्रसंचालन केलं. मी डान्स केले. एक अभिनेत्री म्हणून मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे २७ पुरस्कार मिळाले आहेत. मी सर्वोत्तम कलाकारांबरोबर काम केलं आहे. मी त्याबद्दल कधीच बोलले नाही किंवा बढाया मारल्या नाहीत. पण, आता मला माझी गोष्ट, माझी बाजू सांगितली पाहिजे. जर तुम्ही तुमची बाजू सांगितली नाही, तर लोक तुमचा आवाज दाबतात आणि जी तथ्यं आहेत, त्यामध्ये बदल केले जातात.”

“जसा वेळ जातो, तसं तुम्हाला जाणवतं की, तुमची बदनामी होत आहे. सगळ्यात दु:खद गोष्ट ही आहे की, इतर स्त्रिया हे करत आहेत. महिलाच महिलांबाबत अशा कशा वागू शकतात? मला माझं लग्न टिकवायचं होतं; पण जेव्हा गोष्टी घडल्या, तेव्हा त्याला काही कारणं होती. एखाद्या माणसाला जबाबदार ठरवणं सोपं असतं”, असे म्हणत नीलिमा अझीम यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, याआधीदेखील नीलिमा अझीम यांनी अनेक मुलाखतींत त्यांच्या लग्नाबद्दल, मुलांबद्दल वक्तव्य केले आहे.