‘किंग ऑफ रोमान्स’ शाहरुख खान आज त्याचा ६१ वा वाढदिवस साजर करत आहे. आज संपूर्ण मनोरंजन विश्वातून किंग खानवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. इतकंच नव्हे तर, शाहरुखचं निवासस्थान असलेल्या मन्नत बंगल्याबाहेरही त्याच्या वाढदिवसानिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे. पण, आजच्या घडीला बॉलीवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या, ‘The Last Of The Stars’ अशी ओळख असणाऱ्या शाहरुखचा इंडस्ट्रीमधील सुरुवातीचा प्रवास सोपा नव्हता. आपलं राहतं घर सोडून तो मुंबईत आला होता, त्याने सुरुवातीला टेलिव्हिजन मालिकांमध्येही काम केलेलं आहे.

शाहरुखला त्याच्या करिअरमध्ये सुरुवातीपासून खंबीर पाठिंबा मिळाला तो पत्नी गौरीचा. या दोघांनी ऑक्टोबर १९९१ मध्ये लग्नगाठ बांधत एका नव्या आयुष्याची सुरुवात केली. शाहरुख-गौरीची लव्हस्टोरी सुद्धा एकदम फिल्मी आहे. त्यांच्या लग्नात निर्माते विवेक वासवानी यांनी उपस्थिती लावली होती.

काही वर्षांपूर्वी सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत विवेक वासवानी म्हणाले होते, “शाहरुखचं लग्न झालं तेव्हा त्याच्याकडे स्वत:चं घर नव्हतं. लग्नाआधी तो आमच्या घरी राहत होता. त्यामुळे लग्नाचं गिफ्ट म्हणून या नवविवाहित जोडप्याला मी पाच दिवसांसाठी हॉटेल बूक करून दिलं होतं. त्यानंतर शाहरुख-गौरी निर्माते अझीझ मिर्झा यांच्या एका अपार्टमेंटमध्ये राहायला गेले.”

srk gauri
शाहरुख खान व गौरी खान

“शाहरुखचं लग्न झाल्यावर आम्हाला ‘राजू बन गया जेंटलमन’ चित्रपटासाठी एक शीर्षक गीत शूट करायचं होतं, म्हणून आम्ही सगळे गौरीला घेऊन दार्जिलिंगला गेलो होतो. शूटिंग संपल्यावर आम्ही मुंबईत परतलो त्यावेळी शाहरुख पुन्हा आमच्या घरी राहू शकत नव्हता. म्हणून अझीझ मिर्झा यांच्या एका अपार्टमेंट ते दोघेही राहू लागले.”

शाहरुख खानच्या लग्नाबद्दल सांगताना विवेक वासवानी म्हणाले, “त्यांच्या लग्नात खूप मस्त जेवण होतं. मी, अझीझ मिर्झा, शाहरुखचे बालपणीचे मित्र, गौरीचा भाऊ असे आम्ही सगळेजण त्यांच्या लग्नाला उपस्थित होते. त्या दोघांनी हिंदू तसेच मुस्लीम पद्धतीनुसार लग्न केलं, यानंतर शाहरुखने नोंदणीकृत लग्न ( रजिस्टर मॅरेज ) देखील केलं. त्याने एकाच दिवशी तीन पद्धतीने लग्न केलं.”

srk
शाहरुख खान व गौरी

शाहरुख खानच्या संघर्षाच्या काळात निर्माते विवेक वासवानी यांनी अभिनेत्याला प्रचंड मदत केली होती. त्यामुळे किंग खानच्या यशात त्यांचा सर्वाधिक वाटा असल्याचं बोललं जातं. याबद्दल स्वत: शाहरुखने देखील अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे.