Shahrukh khan Business: शाहरुख खान लवकरच ‘किंग’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीा येणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर अभिनेता अभिषेक बच्चन, अर्शद वारसी आणि त्याची लेक सुहाना खान महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ या गाजलेल्या चित्रपटानंतर तो ‘किंग’ सिनेमात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे त्याला पुन्हा एकदा नवीन भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. तसेच, आता हा किंग खानचा किंग हा सिनेमादेखील त्याच्या इतर चित्रपटांप्रमाणेच धुमाकूळ घालणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

चित्रपटांबरोबर शाहरुख खान त्याच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत येतो. तो चित्रपटांबरोबरच त्याच्या विविध व्यवसायातूनही कमाई करतो. २०२५ मधील हुरून रीच लिस्टनुसार शाहरुख खान हा सर्वात श्रीमंत अभिनेता ठरला आहे.

मनोरंजन क्षेत्रात सर्वांत श्रीमंत अभिनेता शाहरुख खान ठरला आहे. अभिनेत्याची संपत्ती १२,४९० कोटी म्हणजेच १.४ अब्ज इतकी आहे. हुरुनने पहिल्यांदाच शाहरुख खानला अब्जाधीश म्हणून मान्यता दिली आहे. २०२४ मध्ये त्याची संपत्ती ७,३०० कोटी इतकी होती. २०२५मध्ये त्याची संपत्ती १२,४९० कोटी इतकी झाली. वर्षभरात ५,१९० कोटींची वाढ झाल्याचे दिसत आहे.

शाहरुख खान अभिनयातूनच नाही तर व्यवसायातून करतो कमाई

आता शाहरुख खानचे बिझनेस कोणते, हे जाणून घेऊ…

शाहरुख खान फक्त अभिनयातून पैसे कमवतो असे नाही. तर त्याची निर्मिती संस्थादेखील आहे. अभिनेत्याच्या संपत्तीत सर्वात मोठा वाटा रेड चिलीज एंटरटेनमेंट या निर्मिती संस्थेचा आहे. २००२ ला रेड चिलीज एंटरटेनमेंटची स्थापना करण्यात आली.

गेल्या दोन दशकांमध्ये रेड चिलीज एंटरटेनमेंट या संस्थेने अनेक अशा चित्रपटांची निर्मिती केली, जे मोठ्या प्रमाणात गाजले. याबरोबरच, व्हीएफएक्स आणि डिजिटल उपक्रमांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. सध्या ही कंपनी ५०० हून अधिक लोकांना रोजगार देत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात फायदेशीर उद्योगांपैकी एक म्हणून शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट या संस्थेकडे पाहिले जाते.

याबरोबरच, शाहरुख खान आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स या क्रिकेट संघाचा सहमालक आहे. यामध्ये जुही चावला व तिचे पती जय मेहता हे भागीदार आहेत.

दरम्यान, शाहरुख या सगळ्याबरोबरच रिअर इस्टेट आणि लक्झरी ब्रँडमध्येदेखील गुंतवणूक करतो.