शाहरुख खानचा बहुचर्चित ‘जवान’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने नवनवीन रेकॉर्ड निर्माण केले आहेत. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ७५ कोटींची कमाई केली होती. चित्रपट प्रदर्शन होऊन १९ दिवस झाले असतानाही अद्याप या चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही.
सॅकनिल्क’च्या आकडेवारीनुसार ‘जवान’ने १५.६९ कोटींची कमाई केली आहे. या कमाईला धरुन या चित्रपटाचे आत्तापर्यंतचे एकूण कलेक्शन ५६२ कोटी रुपये झाले आहे. चित्रपटाच्या कमाईचा वेग पाहता लवकरच हा चित्रपट भारतात ६०० कोटींचा आकडा पार करु शकतो. ‘जवान’ हा सर्वात जलद ५०० कोटींची कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला आहे. पण तुम्हाला माहितीये का १००० कोटी कमावण्याची भविष्यवाणी किंग खानने १० वर्षांपूर्वीच केली होती.
आणखी वाचा : अभिनेत्री अन् निर्माती म्हणून समोर येणार आलिया भट्ट; आगामी ‘जिगरा’ या चित्रपटाची केली घोषणा
‘जवान’ने २०२३ मध्ये १००० कोटींचा टप्पा पार केला असला तरी हे स्वप्न शाहरुखने १० वर्षांपूर्वीच पाहिलं होतं. नुकताच त्याचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात शाहरुखने १००० कोटी कमावण्याबद्दल भाष्य केलं आहे. एखादा चित्रपट १०० कोटी कमावतो तेव्हा त्याबद्दल कसं वाटतं असं एका पत्रकाराने शाहरुखला मुलाखतीदरम्यान विचारलं होतं. याच मुलाखतीमधील ही छोटीशी क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगली व्हायरल होत आहे.
यावर उत्तर देताना शाहरुख म्हणाला, “आपण आपल्यावरच किती निर्बंध घालून ठेवतो, १०० कोटीच का? १००० कोटी का नाही? मला आवडेल माझ्या चित्रपटाने १००० कोटी कमावले हे ऐकायला, यशाच्या बाबतीत आपण या सीमा आखायची काहीच गरज नाही, फक्त १०० कोटींपुरतंच मर्यादित का राहायचं?” या व्हिडीओखाली लोकांनी कॉमेंट करत शाहरुखचं कौतुक केलं आहे. “जवानबद्दल भविष्यवाणी १० वर्षांपूर्वीच शाहरुखने केली होती” असं एका यूझरने म्हंटलं आहे.
Man Talked about doing a 1000cr film in 2012-13 (when he was asked about 100cr club).
byu/Majestic_District_51 inShahRukhKhan
शाहरुखच्या ‘पठाण’ने जगभरात १०५० कोटींचा गल्ला जमवला होता. आता त्याच्या ‘जवान’ने १००० कोटींचा टप्पा पार केला आहे. शाहरुखचे चाहते आता ‘डंकी’ या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. तो चित्रपटही हा रेकॉर्ड मोडीत काढेल अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.