Shahrukh Khan And Priyanka Chopra: शाहरुख खान हा बॉलीवूडमधील किंग खान म्हणून ओळखला जातो. त्याच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. अभिनेता विविध कार्यक्रमांच्या ठिकाणी उपस्थिती लावतो, त्यावेळी कायमच लक्ष वेधून घेत असतो. शाहरुखने त्याच्या कारकि‍र्दीत अनेक कलाकारांबरोबर काम केले आहे. अनेक निर्माते, दिग्दर्शक, सहकलाकार त्याच्या कामाबद्दल, त्याच्या स्वभावाबद्दल वक्तव्य करताना दिसतात. आता निर्माते शैलेंद्र सिंह यांनी एका मुलाखतीत शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा यांचे स्वभाव, व्यक्तिमत्त्व सारखेच असल्याचे म्हटले आहे.

शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा यांनी दोन चित्रपटांत एकत्र काम केले आहे. प्रियांका त्यानंतर हॉलीवूड चित्रपटाकडे वळली. शाहरुख खान बॉलीवूड चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहिला.

“संपूर्ण बॉलीवूड…”

आता शैलेंद्र सिंह यांनी नुकतीच सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना प्रियांका चोप्राबद्दल प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, “प्रियांका चोप्रासारखे लोक आपल्या देशाचे ब्रँड अम्बेसेडर असायला पाहिजेत. मी अनेकदा असे विचारले आहे की आपल्या इंडस्ट्रीचा आवाज कोण आहे? त्यावर कोणीही उठतं आणि स्वत:बद्दल सांगतं. गेल्या १५ वर्षांपासून करण जोहर तसे काम करत आहे, पण तो म्हणजे संपूर्ण बॉलीवूड आहे का?”

पुढे ते असे म्हणाले, “प्रियांका चोप्रा आपल्या बॉलीवूडचा आवाज असायला पाहिजे. मात्र, आपण तिला इतके वाईट वागवले की तिला देश सोडून जावे लागले. आपण आपल्या सगळ्यात हुशार अभिनेत्रीला जाऊ दिले. मी माझ्या मागच्या मुलाखतीत म्हणालो होतो की, प्रियांका ही एक व्यक्ती आहे, एक ब्रँड आहे आणि एक अभिनेत्री आहे. ती बॉलीवूडला जागतिक स्तरावर घेऊन जाऊ शकली असती, पण ती निघून गेली. विराट कोहलीनेदेखील देश सोडला, तो मॅच खेळतो आणि निघून जातो.”

शैलेंद्र सिंग पुढे असे म्हणाले, “शाहरुख खान हा कामाप्रति समर्पित असणारा अभिनेता आहे. त्याला त्याचे काम समजते. त्याला माहीत आहे की तो कोण आहे. स्टारडम काय आहे, हे त्याला माहीत आहे. तो कायमच प्रोफेशनल असतो, व्यावसायिकदृष्ट्या वागतो, तो कोणालाही कमी लेखत नाही, कमीपणा दाखवत नाही. प्रियांका चोप्रा आणि शाहरुख खान ही दोन लोकं आपल्या देशाचे ब्रँड ॲम्बेसेडर असायला हवीत.”

शाहरुख खान आणि प्रियांका चोप्राबद्दल पुढे ते म्हणाले, “ते दोघे एकसारखे आहेत. त्यांची व्यक्तिमत्त्वे सारखी आहेत. बिझनेसकडे, करिअरकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन सारखाच आहे. दोघेही हुशार आहेत आणि करिअर हाताळण्याची त्यांची पद्धतही सारखीच आहे.”

दरम्यान, शाहरुख खान लवकरच ‘किंग’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.