Shahrukh Khan shares early days in Mumbai: १९९२ ला शाहरुख खानने दीवाना या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. अभिनेत्याचा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. आजही शाहरुखच्या चित्रपटांची तितकीच लोकप्रियता असल्याचे पाहायला मिळते.

शाहरुख खानचा संपूर्ण जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते वाट पाहत असतात. अभिनेत्याच्या मुंबईतील मन्नत या बंगल्यासमोर चाहत्यांची गर्दी होताना दिसते.

शाहरुख खान म्हणाला…

मन्नत हा बंगला शाहरुख खानसाठी खास आहे. अभिनेत्याने ‘स्क्रीन’ला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल वक्तव्य केले. त्याच्या भावना व्यक्त केल्या. मुंबईतील त्याचे सुरुवातीचे दिवस कसे होते, स्थिरता नव्हती, तो काळ कसा होता, याबद्दल वक्तव्य केले. तो दिल्लीतून मुंबईला त्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आला होता. पण, मुंबईतील सुरुवातीचे दिवस त्याच्यासाठी सोपे नव्हते. या काळात तो अनेकदा समुद्राच्या किनाऱ्यावर जात असे.

शाहरुख म्हणाला की, मुंबई हे शहर कधीही थांबत नाही. या शहरात मी खूप लहान असल्यासारखे वाटत असे. अनेकदा आई-वडिलांच्या आठवणीत मी समुद्रावर जात असे. तिथे शांतपणे उभा राहत असे. डोक्यातील विचार कमी करण्यासाठी तो तिथे जात असे. शाहरुख म्हणाला की, या काळात समुद्र माझा शांतपणे साथ निभावत होता. तो माझा साथीदार झाला होता.

शाहरुख खान म्हणाला, “जेव्हा मी पहिल्यांदा मुंबईत आलो होतो. तेव्हा भविष्याबद्दल थोडी खात्री आणि खूप आशा होती. तेव्हा समुद्रकिनाऱ्यावर उभे राहून मी मला काय व्हायचे आहे, याचा मी विचार करत होतो. तो क्षण आजही माझ्या लक्षात आहे.”

त्याच समुद्रकिनाऱ्यावर आज शाहरुख खानचा बंगला आहे. त्याचेच नाव मन्नत, असे आहे. येस बॉस या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याने सहजच एका घराकडे बोट दाखवत म्हटले होते की, तो एक दिवस तो बंगला खरेदी करेन आणि शाहरुखचे हे स्वप्न सत्यात उतरले. त्याने ते घर खरेदी केले.

सी-फेसिंग घराबद्दल बोलताना अभिनेता म्हणाला, “समुद्र तुम्हाला नम्र बनवतो. प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात असणं गरजेचं नाही, याची जाणीव होते. समुद्राच्या अथांगतेमुळे लक्षात येतं की, तुमच्यापेक्षा कितीतरी मोठ्या गोष्टी या जगात आहेत. मोठी स्वप्नं पाहणं आणि काही गोष्टी सोडून देणं यामधला समतोल मी वर्षानुवर्षं माझ्याबरोबर जपला आहे. माझे पाय जमिनीवर असावेत, यासाठी अरबी समुद्र मला कायम मदत करतो.”