शाहरुख खान हा असा अभिनेता आहे, ज्याचे लाखो करोडो चाहते जगभर आहेत. अनेक चित्रपटातील विविध भूमिकांमधून त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. त्याची मुख्य भूमिका असलेले अनेक चित्रपट वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसतात. त्यापैकी एक म्हणजे 'देवदास' हा चित्रपट आहे. आता एका मुलाखतीदरम्यान, किंग खानने 'देवदास' चित्रपटाच्या शूटिंगचा किस्सा सांगितला आहे. काय म्हणाला शाहरुख खान? संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'देवदास' या चित्रपटात शाहरुख खान हा महत्वाच्या भूमिकेत होता. आता लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'देवदास' चित्रपटाविषयी शाहरुख खानने सांगितले, "'देवदास' हा असा चित्रपट आहे, जो माझ्या आईचा सर्वात आवडता चित्रपट होता. तो चित्रपट ती सतत बघायची. माझे वडीलदेखील 'देवदास'बद्दल बोलत राहायचे. हा चित्रपट खास आहे. संजय लीला भन्साळी जेव्हा हा चित्रपट घेऊन माझ्याकडे आले होते, त्यावेळी मी त्यांना नकार दिला होता. त्यावेळी जाताना त्यांनी मला म्हटले की, जर तू या चित्रपटात काम करणार नसशील तर मी हा चित्रपट बनवणार नाही, कारण तुझे डोळे देवदाससारखे दिसतात. पुढचे वर्षभर त्यांनी कोणालाही कास्ट केले नव्हते, त्यानंतर पुन्हा आम्ही भेटलो आणि मी चित्रपट करण्यासाठी होकार दिला. हेही वाचा: नवरा माझा नवसाचा २ : पहिलं गाणं प्रदर्शित! सचिन व सुप्रिया पिळगांवकरांनी जोडीने धरला ठेका; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस ऐश्वर्या राय बच्चन, माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ या तीन दिग्गज कलाकारांबरोबर काम करणे माझ्यासाठी आनंदाचे होते. माधुरी आणि ऐश्वर्या यांच्यासोबत एकाच चित्रपटात काम करणे हा सगळ्यात उत्तम अनुभव होता. पण देवदास चित्रपटात जी माझी भूमिका आहे, तशा भूमिका मला करायला आवडत नाहीत. ज्या भूमिका महिलांचा आदर-सन्मान करत नाहीत. त्यांना अपमानास्पद वागणूक देतात, अशा भूमिका मला करायला आवडत नाहीत. पुढे बोलताना त्याने विनोद करत म्हटले, अनेक लोक हा विचार करतात की मी या चित्रपटासाठी फार मेहनत केली आहे. संजय लीला भन्साळी कलात्मक कारणांमुळे चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी फार वेळ घेतात. देवदासच्या वेळी त्या भूमिकेसाठी मी अनेक रात्री दारु प्यायलो आहे. नाहीतर मी दारु पित नाही. शूटिंगवेळी एका रात्री माधुरी डान्स करत असायची, एका रात्री ऐश्वर्या डान्स करत असायची. त्यावेळी मी जॅकी श्रॉफबरोबर फक्त दारु पित असायाचो. शेवटी लोक मला म्हणायचे की, तू फार मेहनत केली आहेस आणि उत्तम काम केले आहे. अर्धा चित्रपट तर असा होता. शाहरुख खानला ७७ व्या लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.