Suniel Shetty On Shahrukh Khan And Ranbir Kapoor: ज्या बॉलीवूड कलाकाराला पिढ्यान् पिढ्यांचे प्रेम मिळाले तो म्हणजे अभिनेता शाहरुख खान. अभिनेत्याने साकारलेल्या रोमँटिक, गंभीर, खलनायक, अॅक्शन हीरो अशा विविध भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. फक्त भारतातच नाही, तर जगभरात त्याचा चाहतावर्ग आहे.
आता सुनील शेट्टी यांनी नुकतीच राज शम्मानीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी शाहरुख खानचे कौतुक केले. तसेच, शाहरुखचे जे स्टारडम आहे, तितके स्टारडम इतर कलाकार का मिळवू शकले नाहीत, यावरही त्यांनी वक्तव्य केले.
सुनील शेट्टी यांना विचारले की, शाहरुख खानसारखे स्टारडम इतर कोणत्या कलाकाराला का मिळवता आले नाही? यावर ते म्हणाले, ” त्याच्याकडे गाणी होती, त्याच्या चित्रपटातील संगीत उत्तम होते. भारतात संगीत महत्त्वाचे आहे. त्याच्याबरोबर यशजी होते. त्याच्याकडे उत्तमोत्तम गाणी होती. तो त्याच्या कलेप्रति समर्पित आहे. तो सतत स्वत:ला नव्याने घडवत असतो. तो माणूस म्हणून उत्तम आहे. तो इतरांना आदराने वागवतो. त्याच आदराने इतरांनी त्याला वागवावे, अशी त्याची अपेक्षा असते. जेव्हा जेव्हा त्याची एखाद्या ठिकाणी गरज असते, तेव्हा कायम तो हजर असतो.”
“रणबीर कपूरचेदेखील सोशल मीडियावर…”
सुनील शेट्टी असेही म्हणाले, “तो सतत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करतो, असे नाही. त्याच्यात जुन्या काळातील कलाकारांसारखे एक खास आकर्षण आहे. या पिढीतील मुलांना वाटतं की, पुढे जाण्यासाठी, प्रगती करण्यासाठी सोशल मीडिया महत्त्वाचा आहे. पण, हे कलाकार असा विचार करत नाहीत की, रणबीर कपूरचेदेखील सोशल मीडियावर अकाउंट नाही. त्याचे जिथे काम असते, तिथे तो हजर असतो. त्याचे काम बोलते”, असे म्हणत सुनील शेट्टी यांनी शाहरुखसह रणबीरचे कौतुक केले.
सध्या सोशल मीडिया विविध कारणांसाठी वापरला जातो. त्यावर अनेक फोटो, व्हिडीओ पोस्ट केले जातात. कलाकारही सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. अनेकदा काही खास क्षणही ते शेअर करतात. तसेच, काही वेळा त्याचा व्यावसायिकदृष्ट्याही वापर करतात.
शाहरुख खानचे सोशल मीडियावर अकाउंट आहे. तो त्याचा वापर त्याच्या प्रोजेक्टचे प्रमोशन करण्यासाठी वापर करतो. त्याच्या चित्रपटांबद्दल तो सातत्याने गोष्टी शेअर करतो. तर रणबीर कपूरचे सोशल मीडियावर अकाउंट नाही. अभिनेत्याने एकदा खुलासा केला होता की, त्याच्या खासगी अकाउंटवरून तो सोशल मीडियावरील गोष्टी बघत असतो; पण ते पब्लिक अकाउंट व्हावे, अशी त्याची इच्छा नाही. असे असले तरी त्याचे अनेक फॅन पेजेस सोशल मीडियावर आहेत.
दरम्यान, शाहरुख खान लवकरच द किंग या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर अभिषेक बच्चन, तसेच सुहाना खान, अर्शद वारसी प्रमुख भूमिकांत दिसणार आहेत.
