scorecardresearch

‘पठाण’साठी ‘व्हॅलेंटाईन डे’ ठरला लकी; छप्परफाड कमाई करत लवकरच किंग खान मोडणार ‘हा’ रेकॉर्ड

‘पठाण’ची क्रेझ अजूनही कमी होताना दिसत नाही

pathaan box office collection day 21
फोटो : इंडियन एक्सप्रेस

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान हा गेले काही दिवस सातत्याने चर्चेत आहे. शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली. या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. २५ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी ५७ कोटींची कमाई केली. त्यानंतर आत्तापर्यंत जगभरात या चित्रपटाने ९०० कोटीहून अधिक कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने इतिहास रचला आहे.

भारतात आजवर सर्वाधिक जास्त कमाई करणाऱ्या आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटालाही ‘पठाण’ने मागे टाकलं आहे. यात ‘व्हॅलेंटाईन्स डे’ या खास दिवसाने आणखी भर घातली आहे. या दिवसाच्या निमित्ताने काही चित्रपटगृहात ‘DDLJ’ हा शाहरुख काजोलचा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात आला होता. या पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर २२ लाखांची कमाई केली, पण तरी ‘पठाण’ची क्रेझ अजूनही कमी होताना दिसत नाही.

आणखी वाचा : “चित्रपटसृष्टीने त्यांचा…” जावेद खान यांच्या निधनानंतर त्यांचे मित्र आणि अभिनेते अखिलेंद्र मिश्रा यांनी व्यक्त केली खंत

१४ फेब्रुवारीला ‘पठाण’ने तब्बल ५.६५ कोटींची कमाई केली आहे. कालचे आकडे पाहता आत्तापर्यंत या चित्रपटाने भारतात तब्बल ४९८.९० कोटींचा गल्ला जमवला आहे. लवकरच ‘पठाण’ ५०० कोटी क्लबमध्ये धमाकेदार एन्ट्री घेत ‘बाहुबली’ या चित्रपटाच्या कलेक्शनशी थेट स्पर्धा करणार आहे. तब्बल ४ वर्षांनी पुनरागमन करणाऱ्या शाहरुखसाठी हा चित्रपट चांगलाच लकी ठरला आहे.

या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी बरेच वाद निर्माण झाले तरी प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचून आणण्यात शाहरुख खानला यश मिळालं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे. शाहरुखसह यात दीपिका पदूकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-02-2023 at 18:23 IST