scorecardresearch

शाहरुख खानच्या ‘पठाण’चे तिकीट दर होणार कमी; जाणून घ्या तिकीट दर कमी कसे होतात? याचा फायदा कोणाला होतो?

‘पठाण’च्या ६ व्या दिवशीच तिकीट दर कमी होऊ लागल्याने हा आकडा आणखी वाढू शकतो

pathaan ticket rate
फोटो : सोशल मीडिया

शाहरुख खानच्या ‘पठाण’ची सर्वत्र चर्चा होत आहे. बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत या चित्रपटाने इतिहास रचला आहे. जगभरात या चित्रपटाने ५०० कोटी एवढी कमाई केली आहे. या चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यांवर काही लोक संशय घेत आहेत. हे आकडे हे फुगवून सांगितले असल्याचा दावा काही लोक करत आहेत, तर तिकीटदर जास्त असल्याने ही कमाई करणं शक्य असल्याचा काही लोकांचा दावा आहे.

नुकतंच या चित्रपटाचे तिकीट दर कमी होणार असल्याची बातमी समोर आली आहे. सोमवारपासूनच ‘पठाण’च्या तिकीटदरात २५% कपात करण्यात आली आहे. प्रत्येक चित्रपटाचा तिकीटदर दुसऱ्या आठडव्यात कमी होतोच, पण ‘पठाण’च्या ६ व्या दिवशीच तिकीट दर कमी होऊ लागल्याने हा आकडा आणखी वाढू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आणखी वाचा : Photos : चित्रपटातील भूमिकांसाठी ‘या’ कलाकारांनी केली ‘ही’ विशेष गोष्ट; जाणून घ्या

चित्रपटाच्या कलेक्शनचं गणित :

चित्रपटाचं डिस्ट्रीब्यूशन वेगवेगळ्या मार्केट सर्किटमधून होतं. दिल्ली सर्किटमध्ये दिल्ली, उत्तरप्रदेश, उत्तराखंड हा परिसर येतो, मुंबई सर्किटमध्ये मुंबई, गोवा, महाराष्ट्र, गुजरातचा काही भाग आणि कर्नाटकचा काही भाग येतो. चित्रपट डिस्ट्रिब्यूटर हे प्रत्येक चित्रपटगृहापर्यंत चित्रपट पोहोचवायचं काम करतात आणि त्यातून होणाऱ्या कमाईमध्ये दोघांची मिळकत ठरलेली असते. एका तिकीटाची किंमत म्हणजे ग्रॉस कलेक्शन आणि त्यातून सरकारी कर वजा केला तर हातात येतं ते नेट कलेक्शन.

चित्रपट जेव्हा प्रदर्शित होतो तेव्हा डिस्ट्रिब्यूटर आणि प्रदर्शक यांचं प्रॉफिट शेअरिंग प्रत्येकी ५०% असतं, दुसऱ्या आठवड्यापासून मात्र डिस्ट्रिब्यूटर्सची यातील टक्केवारी हळूहळू कमी होते. चित्रपट पाहण्यासाठी पहिल्या आठवड्यात जास्त गर्दी होते त्यामुळे डिस्ट्रिब्यूटरला जास्तीत जास्त नफा पहिल्याच आठवड्यात मिळावा यासाठी हा पर्याय काढण्यात आलेला आहे.

तिकीट दर कसे कमी होतात?

कधीकधी सरकार चित्रपट टॅक्स फ्री म्हणून घोषित करतो, तर कधी डिस्ट्रिब्यूटर आणि प्रदर्शक मिळूनच त्यांचा नफा कमी करून घेतात आणि यामुळेच तिकीट दरात घट होते. तिकीट दर कमी झाल्याचा सर्वात फायदा चित्रपटाला होतो कारण कमीत कमी कींमतीत जास्तीत जास्त लोक हा चित्रपट पाहू शकतात. यामुळे जास्त तिकीट विकली जातात ज्यामुळे चित्रपटाचं कलेक्शन वाढतं.

तिकीट दर कमी झाल्याचा फायदा २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मास्त्र’, ‘भूलभुलैया २’ आणि ‘दृश्यम २’ या चित्रपटांना झाला. या चित्रपटांचंही कलेक्शन चांगलंच वाढलं. हाच फायदा आता शाहरुख खानच्या ‘पठाण’ला होणार आहे. तब्बल ४ वर्षांनी कमबॅक करणाऱ्या शाहरुख खानच्या या चित्रपटाने बॉलिवूडच्या बुडत्या नौकेला चांगलाच आधार दिला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 18:51 IST