Shakti Kapoor Birthday Mithun Chakraborty Ragging Story: बॉलीवूडचे लोकप्रिय अभिनेते शक्ती कपूर यांनी आपल्या अभिनयाच्या खास स्टाईलने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. विनोदी भूमिका असो वा खलनायकाची भूमिका, शक्ती कपूर यांचे वेगळेपण हे पडद्यावर कायम दिसून आले. त्यांच्या चित्रपटांबरोबर त्यांच्या किश्श्यांची जोरदार चर्चा रंगते. सध्या शक्ती कपूर यांचा कॉलेजचा किस्सा समोर आला आहे. मिथुन चक्रवर्ती यांनी कॉलेजमध्ये शक्ती कपूर यांचे रॅगिंग केले होते.
शक्ती कपूर आज त्यांचा ७४ वा वाढदिवस साजरा करत आहेत. मूळचे दिल्लीचे असलेले शक्ती कपूर यांनी मुंबईत बॉलीवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ७०० हून अधिक सिनेमांमध्ये भूमिका करणाऱ्या शक्ती यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय)मध्ये अभिनयाचे शिक्षण घेतले. यावेळी त्यांची भेट मिथुन चक्रवर्ती यांच्याशी झाली होती आणि पहिल्याच भेटीमध्ये त्यांच्यामध्ये मजेशीर किस्सा घडला होता.
मद्य पिण्यावरून केलेले शक्ती कपूर यांचे रॅगिंग
शक्ती कपूर यांनी २०२३ मध्ये दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत एफटीआयआयमधील रॅगिंगचा किस्सा सांगितला होता. त्यावेळी मिथुन चक्रवर्ती हे शक्ती कपूर यांच्यापेक्षा सीनियर होते. पहिल्याच भेटीमध्ये मिथुन यांनी मद्य पिण्यावरून शक्ती कपूर यांचे रॅगिंग केले होते. शक्ती कपूर म्हणालेले, “होस्टेलमध्ये पहिल्यांदाच मिथुन यांच्याशी माझी भेट झाली, त्यावेळी माझ्या हातात मद्य होते.”
पुढे मिथुन यांना पाहिल्यानंतर शक्ती कपूर यांनी त्यांना मद्य पिणार का असे विचारले होते. मात्र, मिथुन यांनी नकार देत एफटीआयआयमध्ये मद्य पिण्यास परवानगी नसल्याचे सांगितले. पण, त्यानंतर शक्ती कपूर यांच्याबरोबर रॅगिंगचा प्रकार घडला होता. मिथुन चक्रवर्ती आणि त्यांच्या मित्रांनी मिळून शक्ती यांना त्रास दिला होता.
हा प्रकार माझ्यासाठी खूपच धक्कादायक – शक्ती कपूर
शक्ती कपूर म्हणाले, “मिथुन चक्रवर्ती आणि त्यांच्याबरोबर असलेल्या काही इतर मित्रांनी मला एका खोलीत ओढून नेलं आणि जमिनीवर पाडलं. त्यानंतर माझ्या केसांनाही कात्री लावली आणि केस कापून टाकले. हा प्रकार माझ्यासाठी खूपच धक्कादायक होता, पण यामध्ये माझीसुद्धा चूक होती. मीच पहिल्यांदा मद्य घेऊन गेलो होतो, त्यामुळे पुढे हे सर्व झाले.”
एफटीआयआयमधील शिक्षणानंतर शक्ती कपूर यांनी चित्रपटसृष्टीत आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. १९८० मध्ये आलेल्या ‘कुर्बानी’ चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेमुळे त्यांना मोठी ओळख मिळाली. त्यानंतर ‘हिम्मतवाला’, ‘हीरो’, ‘राजा बाबू’, ‘बोल राधा बोल’, ‘बाजीगर’, ‘बाप नंबरी बेटा दस नंबरी’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आता शक्ती कपूर यांची मुलगी श्रद्धा कपूर बॉलीवूडमध्ये काम करत आहे.
