Shakti Kapoor on Shraddha Kapoor: श्रद्धा कपूर ही बॉलीवूडमधील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. तिची प्रमुख भूमिका असलेल्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. काही सिनेमांना तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. स्त्री २ या सिनेमाच्या कमाईने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तयार केला होता.

सिनेमांबरोबरच श्रद्धा कपूर सोशल मीडियावरही सक्रिय असते. ती विविध फोटो, व्हिडीओ शेअर करीत चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्टना प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते. अनेक चाहते कमेंट्सद्वारे तिचे कौतुक करताना दिसतात. श्रद्धा तिच्या खोडकर अंदाजाने, कधी तिच्या डान्सने, तर कधी पारंपरिक लूकमधून प्रेक्षकांची मने जिंकते. अनेकदा पापाराझींबरोबर बोलताना श्रद्धा मराठीत बोलते आणि तिचा हा अंदाज प्रेक्षकांना आवडतो.

आता श्रद्धाचे वडील शक्ती कपूर यांनी एका मुलाखतीत तिचा स्वभाव कसा आहे, याबद्दल सांगितले होते. ती हट्टी, लहरी असल्याची माहिती त्यांनी दिली होती. त्याबरोबरच तिची पैसे खर्च करण्याची सवय, तिच्या रिलेशनशिप आणि जेव्हा शक्ती कपूर यांना ट्रोल केले जायचे, तेव्हा ती व्यक्त व्हायची, याबद्दल त्यांनी खुलासा केला होता.

“ती १०० रुपयांची…”

शक्ती कपूर यांनी ‘फिल्मफेअर’ला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत श्रद्धाच्या पैसे खर्च करण्याच्या सवयीबद्दल ते म्हणालेले, “तिचे आर्थिक व्यवहार सांभाळणे सोपे आहे. कारण- ती दोन पैसे कमावते आणि आठ पैसे खर्च करते. ७० रुपयांच्या हॅम्बर्गरसाठी ती १०० रुपयांची टीप देते. ती जेव्हा परदेशात जाते, तेव्हा मला तिला तिथल्या चलनाची किंमत अगदी सविस्तर समजावून सांगावी लागते. ती वस्तू घेताना घासाघीस करीत नाही.”

पुढे त्यांनी श्रद्धाच्या रिलेशनशिपबद्दलही वक्तव्य केले होते. ते म्हणालेले, “आम्ही श्रद्धावर कोणतीही बंधनं घातलेली नाहीत. ती तरुण आहे आणि त्यामुळे तिला बॉयफ्रेंड असणं साहजिकच आहे. मात्र, मी तिला नेहमी एकच गोष्ट सांगतो की, कोणालाही फसवू नकोस आणि स्वतःही कुणाकडून फसू नकोस.”

जेव्हा शक्ती कपूर अभिनय क्षेत्रात सक्रिय होते, त्यावेळी त्यांच्याबद्दल चुकीच्या गोष्टी बोलल्या जात असत किंवा त्यांना ट्रोल केले जात असे, त्यावेळी श्रद्धा त्यावर कशी व्यक्त होत असे, याबद्दलही शक्ती कपूर यांनी वक्तव्य केले होते. ते म्हणालेले, “माझ्याविषयीच्या अफवा किंवा वादग्रस्त बातम्या वाचल्यानंतर श्रद्धा अनेकदा अस्वस्थ व्हायची. ती मला म्हणायची की, पापा या फालतू गोष्टींकडे लक्ष देऊ नका; पण ती स्वत: मात्र अस्वस्थ असायची. शाळेतही माझ्याबद्दल कोणी वाईट बोललं, तर श्रद्धा गप्प बसायची नाही. अनेकदा त्यावरून तिची मोठी भांडणंही व्हायची.”

पुढे शक्ती कपूर असेही म्हणाले होते की, आता मी तिच्याबद्दल काही वादग्रस्त ऐकतो, तेव्हा मी तिला सांगतो की, मी समजू शकतो आणि यामुळे मला त्रास होत नाहीये.

दरम्यान, श्रद्धा लवकरच इठा या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिच्या या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.