Shakti Kapoor & Shivangi Kolhapure Lovestory : बॉलीवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांची प्रेमकहाणी खूप हटके आहे. यापैकीच एक नाव म्हणजे बॉलीवूडचे खलनायक शक्ती कपूर व त्यांच्या पत्नी शिवांगी कोल्हापुरे. कुटुंबीयांनी विरोध केल्यानंतरही त्यांनी एकमेकांची साथ न सोडता संसार थाटला. पण, शक्ती कपूर यांची प्रेमकहाणी कशी आहे जाणून घेऊयात…

शक्ती कपूर बॉलीवूडमधील लोकप्रिय खलनायक आहेत. आजवर विविध चित्रपटांत खलनायकाची भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. या भूमिकांमुळे त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. खलनायकाची भूमिका साकारूनही इतकं प्रेम मिळवणाऱ्या अभिनेत्यांपैकी ते एक आहेत. त्यांनी एका पेक्षा एक अशा खलनायकाच्या भूमिका आजवर साकारल्या आहेत. पण, तुम्हाला माहीत आहे का त्यांच्या याच भूमिकांमुळे आणि आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या प्रेमला विरोध झाला होता.

पडद्यावर नकारात्मक भूमिका साकारणारे शक्ती कपूर खऱ्या आयुष्यात मात्र खूप विनम्र आहेत आणि त्यांच्या पत्नी शिवांगी कोल्हापुरे यांच्याबरोबरही त्यांचे खूप चांगले संबंध आहेत. एबीपीच्या वृत्तानुसार शक्ती व शिवांगी यांच्या प्रेमाला त्यांच्या कुटुंबीयांकडून विरोध झाला होता. दोन कुटुंबीयांमधील सांस्कृतिक मतभेदांमुळे ते या नात्यासाठी तयार नव्हते असं म्हटलं जातं. शिवांगी एका प्रतिष्ठित आणि समृ्द्ध मराठी कुटुंबातून आहेत, तर शक्ती कपूर यांचं कुटुंब तितकं समृद्ध नव्हतं. त्यांच्या भूमिकांमुळे तयार झालेल्या त्यांच्या व्यक्तीरेखेमुळेसुद्धा त्यांना अडचणी आल्या असं म्हटलं जातं. उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार एका मुलाखतीत शक्ती कपूर यांनी त्यांच्या नात्यात सुरुवातीला आलेल्या अडचणींबद्दल सांगितलं आहे.

शक्ती कपूर यांनी सांगितलेली प्रेमकहाणी

शक्ती कपूर म्हणालेले, “शिवांगी आणि मी पळून जाऊन लग्न केलं. आम्ही प्रेमात पडलो होतो, पण कुटुंबीयांचा विरोध होता म्हणून आम्ही पळून जाऊन लग्न केलं. ती मराठी आहे आणि मी पंजाबी. मी खलनायकाची भूमिका साकारल्याने माझी वेगळी ओळख तायर झालेली आणि त्यांच्या कुटुंबीयांची सहमती नव्हती, म्हणून आम्हाला पळून जाऊन लग्न करावं लागलं.” काही केल्या कुटुंबीयांची सहमती मिळत नसल्याने शिवांगी कोल्हापुरेसुद्धा लग्नासाठी तायर झाल्या. त्यावेळी त्या पूर्ण १८ वर्षांच्याही नव्हत्या. शक्ती कपूर व शिवांगी कोल्हापुरे यांनी कोर्ट मॅरेज केलं.

दरम्यान, शक्ती कपूर यांच्या अभिनयाचा वारसा त्यांची लेक श्रद्धा कपूर पुढे नेत आहे. श्रद्धा कपूर बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असून तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी सोशल मीडियावर शेअर करत असते. अनेकदा ती तिचे वडील शक्ती यांच्याबरोबरचे व्हिडीओ व फोटोसुद्धा शेअर करत असते.